गेल्या ९ वर्षांपासून मराठी रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ अजूनही मनोरंजन करत आहे. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम आहे. काही महिन्यांपूर्वी हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं समोर आलं होतं. पण तसं काही झालं नाही. मात्र आता या कार्यक्रमातील महत्त्वाची धुरा सांभाळणारा अभिनेता रामराम करणार असल्याचं समोर आलं आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना अधिक लोकप्रियता मिळाली. भाऊ कदम, कुशल बद्रिकेपासून ते स्नेहल शिदमपर्यंत सर्वच कलाकार या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच नाहीतर जगभराच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. या कलाकारांना ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने एक वेगळी ओळख दिली. अशा या लोकप्रिय कार्यक्रमातून एका महत्त्वाच्या कलाकाराची एक्झिट होणार आहे.

हेही वाचा – ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आणि ‘साधी माणसं’ या नव्या मालिकेचं आहे खास कनेक्शन, काय ते? वाचा…

‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात विविधांगी भूमिका साकारणारा, कॅप्टन ऑफ द शीप म्हणजे अभिनेता निलेश साबळे प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामागचं कारणही त्याने स्पष्ट केलं आहे. निलेश म्हणाला, “चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम मी सोडला असल्याची चर्चा आहे. कार्यक्रम सध्या चार-पाच महिन्यांच्या गॅपवर चालला आहे. चॅनलने ठरवलं तर कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. पण तब्येतीच्या कारणाने मी थोडेदिवस मी कार्यक्रमातून बाहेर असेल.”

हेही वाचा – वर्षही पूर्ण न होता ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, जाणून घ्या…

दरम्यान, ‘फूबाईफू’ हा लोकप्रिय कार्यक्रम बंद होण्यापूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम सुरू झाला होता. २०१४ साली ‘लयभारी’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील कलाकारांची भट्टी जमली होती. तेव्हापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. सुरुवातीला या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अनेक पर्व आणि विविध उपक्रम राबवले गेले. पण मध्यंतरी हा कार्यक्रम सुमार होतं चालल्याची प्रेक्षकांची तक्रार होती. तसेच टीआरपी देखील घसरला. त्यामुळेच कार्यक्रम बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली.