‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘पारु’ या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे प्रमुख भूमिका साकारत आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या गाजलेल्या मालिकेमुळे अभिनेता घराघरांत लोकप्रिय झाला. पुढे, त्याने ‘बिग बॉस’मराठीमध्ये सहभाग घेतला होता. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यावर वैयक्तिक आयुष्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रसादने अमृता देशमुखशी लग्नगाठ बांधली.

प्रसाद आणि अमृताची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. लग्नानंतर दोघांनीही आता पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. प्रसाद ‘पारु’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून, अमृता सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसत आहे. गेली वर्षभर प्रसादने स्वत:वर भरपूर मेहनत घेतली. त्याने जवळपास २८ किलो वजन कमी केलं. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना अभिनेत्याने याबद्दल खुलासा केला आहे.

हेही वाचा : Video : “शरद पवारांच्या वयात स्टेजवर बसलेल्या गावगुंडांची…”, किरण मानेंची सत्ताधाऱ्यांवर टीका; म्हणाले…

प्रसाद म्हणाला, “एक वर्षाआधी माझं वेळापत्रक निश्चित नव्हतं. मी हवं तसं वागायचो. पण, कालातरांने ही जीवनशैली चुकीची असल्याची जाणीव मला झाली. वेळेत खाणं, झोपणं आणि व्यायाम करणं ही सगळी शिस्त मी स्वत:ला लावली. माझ्या शरीरात हळुहळू बदल जाणवू लागला. या सगळ्याचा फायदा मी सध्या साकारत असलेल्या आदित्य किर्लोस्करच्या भूमिकेसाठी मला झाला.”

प्रसाद पुढे म्हणाला, “मला जीमला रोज जाता येत नाही. त्यामुळे मी घरी व्यायाम करतो. यासाठी ट्रेनर मला ऑनलाइन मदत करतो. अर्धा-पाऊण तास वेळ मिळाला, तर मी आवर्जून धावायला जातो. प्राणायाम करतो…आठवड्यातून चार दिवस तरी हे वेळापत्रक मी काटाक्षाने पाळतो यामुळे माझं २८ किलो वजन कमी झालं आहे.”

हेही वाचा : रिहानाने प्री-वेडिंग सोहळ्यात बोलताना चुकवलं अंबानींच्या सूनबाईंचं नाव; राधिकाऐवजी म्हटलं…, तुम्हीच पाहा Video

“मी आता रोज ४ लिटर तरी पाणी पितो. पाण्यासाठी माझी दोन लिटरची खास बॉटल आहे. वरण-भात, भाजी, पोळी असा संपूर्ण आहार मी घेतो. या सगळ्यात गोड खाण्यावर माझं नियंत्रण असतं. तुम्हाला फिट राहायचं असेल आणि वेळ मिळत नसेल तर, दिवसातून एकदा तरी चालायला जा. यामुळे शरीरातील अनेक व्याधी दूर होतात. या सगळ्या मेहनतीचं फळ मला आदित्य किर्लोस्करची भूमिका साकारताना मिळालं. पहिल्याच प्रोमोमध्ये मी फिट दिसत होतो त्यामुळे मलाही तो प्रोमो पाहून आनंद झाला.” असं प्रसादने सांगितलं.