‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या १८ मार्चपासून दोन नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आरोही सांबरे अभिनीत ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि शिवानी बावकर व आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘साधी माणसं’ या दोन नव्या मालिका सुरू होत आहेत. त्यामुळे सध्या या दोन मालिकांविषयी चर्चा रंगली आहे. अशातच ‘साधी माणसं’ या मालिकेचा नवा जबरदस्त प्रोमो समोर आला आहे.

काल, २८ फेब्रुवारीला ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘साधी माणसं’ या मालिकेचा दुसरा प्रोमो शेअर करण्यात आला. ज्यामध्ये शिवानी बावकर म्हणजे मीरा व आकाश नलावडे म्हणजे सत्या यांच्यामधील नोकझोक पाहायला मिळत आहे. ‘साधी माणसं’चा हा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – ‘नवरा माझा नवसाचा २’ कधी होणार प्रदर्शित? सचिन पिळगांवकर यांनी केलं जाहीर

शिवानी व आकाशच्या या नव्या मालिकेच्या या नव्या प्रोमोवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. रेश्मा शिंदे व आशुतोष गोखले यांनी ‘गोड’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सुयश टिळक, परी तेलंग, शशांक केतकर, तन्मय जक्का, किशोरी अंबिये अशा अनेक कलाकारांनी ”साधी माणसं’च्या नव्या प्रोमोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय बऱ्याच नेटकऱ्यांनी मालिकेच्या शीर्षकगीताचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – ‘रसोडे में कौन था?’ फेम यशराज मुखाटे अडकला लग्नबंधनात, फोटो शेअर करत म्हणाला, “आज दोन मोठ्या…”

मालिकेची कथा

‘साधी माणसं’ या मालिकेत शिवानी म्हणजेच मीरा ही फुलविक्रेती आहे, तर आकाश म्हणजेच सत्या कामधंदे नसणारा दारुच्या आहारी गेलेला तरुण दाखवण्यात आला आहे. एकाच शहरात राहत असले तरी दोघांचा भिन्न स्वभाव आहे. आता या दोघांची भेट कशी होणार? नियती यांच्याबरोबर काय करणार? हे या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.