‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या साक्षी-चैतन्यच्या साखरपुड्याचा सीक्वेन्स चालू आहे. अर्जुनला मात्र मित्राचा हा निर्णय पटलेला नसतो. आपल्या मित्राला काही करून साक्षीच्या जाळ्यातून सोडवायचं असा निर्धार अर्जुन करतो. यासाठी अर्जुन-सायली आता पुराव्यांची शोधाशोध करणार आहेत. आता येत्या काळात मालिकेत नेमकं काय घडणार? अर्जुनने साक्षीचा खरा चेहरा उघड केल्यावर चैतन्य साखरपुडा मोडणार का या गोष्टी मालिकेच्या आगामी भागांत पाहायला मिळणार आहेत.

चैतन्य अचानक सुभेदारांच्या घरी येऊन ‘मी आणि साक्षी लवकरच साखरपुडा करणार आहोत’ असं सांगतो. त्याचा निर्णय ऐकून सगळेच विचारात पडतात. अर्जुनला चैतन्यची काळजी वाटू लागते. साक्षी त्याची फसवणूक करतेय हे आपण चैतन्यला कसं पटवून द्यायचं याबद्दल अर्जुन सायलीशी चर्चा करतो. यावर ती सांगते, “आपण कुणालसंदर्भात आणखी पुरावे शोधून चैतन्यला सगळं खरं सांगूया” यानुसार ते दोघेही आणखी पुरावे शोधण्याचा निर्णय घेतात.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “आता थेट पोलीस…”

चैतन्यला कोणीही कुटुंबीय नसल्याने सुभेदारांचा त्याला मोठा आधार असतो. यासाठी तो सगळ्या कुटुंबीयांना साखरपुड्याला येण्याची विनंती करतो. चैतन्यच्या विनंतीला मान देऊन पूर्णा आजीसह संपूर्ण सुभेदार कुटुंबीय त्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात. परंतु, इतक्यात मागून अर्जुन-सायलीची एन्ट्री होते.

हेही वाचा : “रुद्राज चार महिन्यांचा होता”, बाळंतिणीचा संसार घेऊन कोल्हापूरला गेलेली नम्रता संभेराव, नवऱ्याने ‘अशी’ दिली साथ

सगळे राग-रुसवे विसरून लाडका मित्र साखरपुड्याला आल्याचं पाहून चैतन्यला भरून येतं. तो अर्जुन-सायलीला भेटायला जातो. यावर हे दोघं चैतन्यला घेऊन एका खोलीत जातात आणि कुणाल संदर्भातील सगळे पुरावे चैतन्यला दाखवतात. पुरावे पाहून चैतन्य थक्क होतो. त्याला पुढे काय बोलावं हे सुचत नसतं. आपण खूप मोठी चूक केल्याचं त्याला जाणवतं. मी हा साखरपुडा मोडतोय…असं सांगून चैतन्य साक्षीला जाब विचारायला जातो पण, तेवढ्यात सायली त्याला अडवते.

“आजवर साक्षीने तिच्या सोयीनुसार तुमचा वापर केला, आता आपण एकत्र येऊन तिला धडा शिकवूया” असं सायली चैतन्यला सांगते. तिघे मिळवून हातमिळवणी करत असल्याचं मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता चैतन्य आणि अर्जुन-सायली मधुभाऊंना तुरुंगातून केव्हा सोडवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मालिकेचा हा विशेष भाग येत्या २ मे रोजी रात्री ८.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.