आपल्याकडे टेलिव्हिजनवर जेवढी क्रेझ ‘सीआयडी’सारख्या कार्यक्रमाची होती, तेवढीच क्रेझ ‘क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमाची आहे. आजही या कार्यक्रमातील बरेच जुने एपिसोड लोक युट्यूबवर पाहतात. या कार्यक्रमाप्रमाणे अभिनेता अनुप सोनी याला घराघरात ओळख मिळाली. ‘सावधान रहिये सतर्क रहिये’ हा डायलॉग डोळे बंद करून ऐकला तरी लोकांच्या डोळ्यासमोर अनुप सोनीचा चेहेरा येतो. नाटक, दूरदर्शनवर काम करणाऱ्या अनुप सोनीचं नाव लोकांपर्यंत पोहोचलं ते ‘क्राइम पेट्रोल’मुळे.

या कार्यक्रमामुळे अनुपला लोकप्रियता प्रचंड मिळाली पण यामुळे त्याचं नुकसानही झालं. याबद्दल नुकतंच अनुपने एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं. ‘दी लल्लनटॉप’च्या बैठकी या कार्यक्रमात नुकतीच अनुप सोनीने हजेरी लावली अन् आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला. तसेच ‘क्राईम पेट्रोल’सारख्या कार्यक्रमात सूत्रसंचालक म्हणून काम करताना आलेले अनुभव अन् त्याने नेमका हा कार्यक्रम सोडायचा निर्णय का घेतला? यावर मानमोकळेपणे भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार इम्तियाज अलीचा बहुचर्चित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’; वाचा कुठे पाहायला मिळणार?

मुलाखतीदरम्यान अनुप म्हणाला, “माझ्या आयुष्यातील २००८ ते २०१८ हा काळ पूर्णपणे ‘बालिका वधू’ आणि ‘क्राईम पेट्रोल’मध्ये काम करण्यात गेला. २०१४ मध्ये मी ‘बालिका वधू’ ही मालिका सोडली होती, पण त्यावेळी ‘क्राईम पेट्रोल’च्या कामाचा खूप ताण होता अन् यामुळेच मी इतर काहीच करू शकलो नाही. २०१४ नंतर मी अभिनय केलाच नाही, मी फक्त सूत्रसंचालन करत होतो. त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. मला अभिनयासाठी कुणीच विचारत नव्हतं, कारण सगळ्यांना वाटायचं की मी ‘क्राईम पेट्रोल’मध्ये प्रचंड व्यस्त आहे.”

२०१७ मध्ये ‘द टेस्ट केस’ या वेबसीरिजमध्ये अनुप सोनीला एक भूमिका देण्यात आली अन् त्यानंतरच त्याला जाणीव झाली की आपल्या आयुष्यात याच गोष्टीची कमी होती अन् २०१९ मध्ये अनुपने ‘क्राईम पेट्रोल’ला रामराम केला. पुढे अनुप म्हणाला, “क्राईम पेट्रोल केल्यामुळे मी नाराज होतो असं अजिबात नाही. या कार्यक्रमामुळे मला जे नाव, प्रतिष्ठा, लोकप्रियता मिळाली तसं कोणत्याही कार्यक्रमातून मला मिळालं नाही आणि मी ते विसरणार नाही.”

‘क्राईम पेट्रोल’ सोडल्यानंतर अनुप सोनीने काही दिग्दर्शकांची यादी बनवली व त्यांच्याकडे अभिनयाच्या कामासाठी फोन करायला सुरुवात केली. त्याने चित्रपट आणि टेलिव्हीजनमध्ये बरंच काम केलं. ‘फिजा’, ‘गंगाजल’सारख्या चित्रपटात अनुपच्या कामाची प्रशंसा झाली. याबरोबरच त्याने ‘सीआयडी’ आणि ‘आहट’सारख्या मालिकांमध्येही काम केलं. नुकताच अनुप नेटफ्लिक्सच्या ‘खाकी’ या वेबसीरिजमध्ये झळकला होता.