तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा बहुप्रतिक्षीत ट्रेलर आज लाँच करण्यात आला आहे. आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा अशी स्टारकास्ट असणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर अनेकांना आवडल्याचे सोशल मिडियावरून दिसत आहे. #ThugsOfHindostanTrailer हा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसत आहे. असं सगळं असलं तरी या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आठ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच ऐन दिवाळीमध्ये निर्मात्यांनी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याच्या दृष्टीने ही तारीख निवडली असली तरी नेटकऱ्यांनी या तारखेचा दुसरा संबंध शोधून काढला आहे. दोन वर्षापूर्वी आठ नोब्हेंबरलाच केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ नोटबंदीच्या दुसऱ्या वर्धापनदिनी सर्वांच्या भेटीस येत असल्याची चर्चा इंटरनेटवर रंगली आहे.

अशा पद्धतीचे काही ट्विटस सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेकांना हा न कळत जुळून आलेला योगायोग ट्विटवरून लक्षात आल्यानंतर त्यांनी आणखीन एक गोष्ट निदर्शनास आणून दिली. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर २०१८ रोजी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमाचे पहिले टायटल पोस्टर प्रदर्शित केले होते.

सिनेमाच्या विकीपिडीया पेजवरही सिनेमाच्या टीमने १७ सप्टेंबर रोजी सिनेमाचा औपचारिक लोगो आणि टायटल पोस्टर युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर दर दिवशी सिनेमातील एक एका भूमिकेचा लूक टप्प्याटप्प्यात प्रदर्शित करण्यात आला.

अर्थात सिनेमाचा विषय हा नोटबंदीशी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसला तरी जुळून आलेला हा योगायोग नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटला नाही हे मात्र नक्की. दुसरीकडे निवडणुका एका वर्षांवर आल्या असून काँग्रेस भाजपा एकमेकांच्या विरोधात रान उठवत आहेत. भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेसही सोशल मीडियावर आक्रमकपणे टिका करत आहे. मोदींवर काँग्रेसकडून फेकू, जुमलेबाज अशा शब्दांमध्ये टिका करण्यात येत आहे. काँग्रेसच्या सोशल सेलच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी तर भाजपाचे ए टू झेड घोटाळे ट्विट केले आहेत.

आता, नेटकऱ्यांच्या लक्षात आलेली ठग्ज ऑफ हिंदोस्तानच्या प्रदर्शनाची व नोटाबंदीच्या वर्धापनदिनाची सांगड काँग्रेसच्या लक्षात येतेय का, हे बघणं रंजक ठरणार आहे.