लग्नसोहळ्यावर आधारित ‘शुभ लग्न सावधान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी विनय जोशीनिर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित येत्या १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मराठमोळ्या लग्न समारंभासारखे वातावरण तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, हजर राहिलेल्या प्रत्येकाचा विशेष पाहुणचारदेखील करण्यात आला. लग्नसंस्थेवर आधारित असलेल्या या चित्रपटात सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिकेत असून चित्रपट ‘लग्न’ या विषयावर आधारित आहे. लग्नाबद्दलची मतमतांतरे यात पाहायला मिळणार आहेत. डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी या चित्रपटात आहे. विवाहोत्सुकांना आपलासा वाटेल असा हा चित्रपट, कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून आकारास आला आहे.