पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा वाढता संसर्ग पाहता देशात २१ दिवसांचे लॉकडाउन घोषीत केले. त्यानंतर अनेकांना घरात बसून काय करावे असा प्रश्न पडला होता. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांचे चित्रीकरण अनपेक्षित काळासाठी थांबवण्यात आले असल्याने सध्या सगळे जुने भाग पुन्हा दाखवण्यात येत आहेत. अशातच सोशल मीडियावर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पुन्हा दाखवण्याची मागणी करण्यात आली. पण आता एका अभिनेत्रीने रामायण पुन्हा दाखवण्यावर वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे.

ऐंशीच्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘रामायण.’ आता ही मालिका प्रेक्षकांच्या मागणीनुसार पुन्हा दाखवण्यात येत असल्याने सर्वजण आनंदी असल्याचे दिसत आहे. अशातच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कविता कौशिकने रामायणाच्या पुनर्प्रक्षेपणावर प्रश्न उपस्थित करत वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. पण तिच्या या वक्तव्यानंतर ती स्वत:च सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

‘तुम्ही संसदेत बसून मोबाइलवर पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण पाहण्यास सांगता’ असे कविताने ट्विट केले होते. या ट्विटनंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले. एका युजरने तिला तू मोबाइलवर काही पाहू शकतेस. रामायण तर टीव्हीवर दाखवले जात आहे असे म्हणत तिला चांगलेच सुनावले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने तिला अटक करावी अशी मागणी केली आहे.

कविताने छोट्या पडद्यावरील एकता कपूरच्या ‘कुटुंब’ या मालिकेत भूमिका साकारली होती. पण ती सब टीव्हीवरील ‘F.I.R’ या मालिकेने प्रकाश झोतात आली. त्यानंतर तिने ‘डॉक्टर भानुमति ऑन ड्यूटी’ या मालिकेत काम केले. तसेच ती ‘नच बलिये’ आणि ‘झलक दिखलाजा’ या शोमध्ये देखील दिसली होती. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर पतीचा भांडी धुतानाचा फोटो शेअर केला होता. तेव्हा देखील तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.