बॉक्स ऑफीसवर दर आठवड्याला नवेनवे चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण या सर्व चित्रपटांना सध्या अभिनेता विकी कौशलचा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइल’ तगडी टक्कर देत आहे. चार आठवड्यांत या चित्रपटाने तब्बल १८०.८२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट २०० कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘उरी’नंतर ‘ठाकरे’, ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ असे चित्रपट प्रदर्शित झाले. पण या चित्रपटांमुळे ‘उरी’च्या कमाईवर फारसा परिणाम झाला नाही. शुक्रवारी या चित्रपटाने ३.४० कोटी रुपये तर शनिवारी ६.३५ कोटी रुपये कमावले. याच शुक्रवारी कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ने ३.५० कोटी रुपये तर शनिवारी ५.२५ कोटी रुपये कमावले. चौथा आठवडा असूनही ‘उरी’ने इतर चित्रपटांना चांगली टक्कर दिली आहे.

जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केलानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. ‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून भारताच्या सूडाची कहाणी सांगण्यात आली आहे.