स्टार अभिनेता म्हणून चाहत्यांनी आपल्याकडे बघावं, यासाठी अनेक कलाकार जीवापाड मेहनत घेत असतात. त्यासाठी मिळेल ती भूमिका जीव लावून करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण एक अभिनेता असाही आहे की ज्याच्याकडे चाहते स्टार म्हणून बघायला लागल्यावर त्याला आनंद होण्याऐवजी अवघडल्यासारखंच जास्त झालं. अरविंद स्वामी असं या अभिनेत्याचं नाव. अरविंद स्वामी प्रसिद्धीच्या झोतात आला तो ‘बॉम्बे’ आणि ‘रोजा’ या चित्रपटांमुळे. या दोन चित्रपटांतील त्याची भूमिका इतकी गाजली की देशातील अनेक तरुणींची अरविंद स्वामी पहिली आवड बनला.
एका मुलाखतीत अरविंद स्वामी म्हणतो, खरंतर मला कधीच अभिनेता व्हायचे नव्हते. पण अभिनेता म्हणून काम करताना चित्रपट निर्मिती प्रक्रियेचा मी पुरेपूर आनंद लुटला. पण या चित्रपटांतील भूमिकांमुळे लोकं माझ्याकडे स्टार म्हणून बघायला लागल्यावर मला थोडंसं अवघडल्यासारखंच झालं. या बदलासाठी मी तयार झालो नव्हतो. त्यावेळी मी अगदी विशीमध्येच होतो. चित्रपटांचे यश मला भावले. पण त्यामुळे सगळेजण माझ्याकडेच बघायला लागल्याचे मला भावले नाही. तुम्ही माझे चित्रपट पाहा, पण मला एकटं राहू द्या, अशीच माझी भावना होती, असे त्याने म्हटले आहे.
स्टार म्हणून तुम्ही घरातून बाहेर आला आणि १०० लोकं तुमच्याकडे बघत आहेत, असे दिसले तर काहींना खूप आनंद होतो. तर काही जण बिचकून परत घरात जातात. मी दुसऱ्या प्रकारातील आहे, असेही अरविंद स्वामीने म्हणतो.
‘राजा को रानी से प्यार हो गया’ या २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अरविंद स्वामी दिसला होता. त्यानंतर त्याने कोणत्याही हिंदी चित्रपटात काम केलेले नाही.