अमेरिकी पल्प फिक्शनच्या बहरकाळात (१९४०-५०) हॉलीवूडने गुन्हेपटांची मुहूर्तमेढ रोवली. भुरटय़ा चोरांपासून ते आंतरराष्ट्रीय माफियांची व्यक्तिचित्रे मांडणाऱ्या गुन्हेपटांची यादी अनंतात निघेल. पण काळा सिनेमा किंवा ‘फिल्म न्वार’ ही गुन्हेपटांची एक आणखी शाखा जगभरातल्या सिनेमांमध्ये हॉलीवूडकडून निर्यात झाली. फ्रेंच आणि हॉलीवूड क्राइम सिनेमाची संकरित आवृत्ती असलेल्या या फिल्म न्वार प्रकाराचे वैशिष्टय़ म्हणजे त्यातल्या सर्वच व्यक्तिरेखा कोणत्या ना कोणत्या अडचणींतून गुन्हेलोलूप बनतात. यात सर्वात पापभीरू व्यक्ती सर्वाधिक आक्रमक होते. सर्वात सभ्य व्यक्ती अधोलोकाच्या अंतरंगात रुतत जाते आणि मानवी सभ्यतेच्या, मूल्यांच्या ऱ्हासाची कहाणी फुलत जाते. अलीकडच्या दशकांत ‘फॉलिंग डाऊन’, ‘सिम्पल प्लान’, ‘शॅलोग्रेव्ह’, ‘बिग नथिंग’पासून कोएन ब्रदर्सच्या गुन्हेगारी मानसिकतेचा शोध घेणाऱ्या किती तरी सिनेमांमध्ये सर्वसामान्य व्यक्ती स्वत:वर गुदरलेल्या प्रसंगांमुळे एखाद्या छोटय़ा असंमत घडामोडीत सहभागी होऊन कथानकातील गुन्हेग्राफ चढता ठेवतात. (आपल्याकडचे डोंबिवली फास्ट, फिर हेराफेरीपासून अलीकडे टेरेन्टीनो स्कूलने प्रभावित विशाल भारद्वाजचे गुन्हेपट याच पंगतीत बसविता येतील.)

‘आय डोण्ट फिल अ‍ॅट होम इन धिस वर्ल्ड एनिमोअर’ हा मोठय़ा नावाचा ताजा चित्रपट वर सांगितलेल्या सभ्य गुन्हेगारीपटांची हवी तेवढीच वैशिष्टय़े घेऊन मिश्रचित्र प्रकाराची धमाल उडवून देतो. इथे अतिसभ्य नायिका समाजसंमत मूल्य, नैतिकतेच्या मार्गाची कास शेवटपर्यंत टिकवून ठेवते. पण तिचा भवताल मात्र तिच्या भूमिकेने साधा राहत नाही. तो नवनव्या बिकट प्रसंगांची मालिकाच तिच्यापुढय़ात उभी करतो. या नायिकेचे नाव आहे रूथ (मेलनी  लिन्स्किी).

रूथ ही प्रचंड एकलकोंडी आणि स्वत:चे स्वातंत्र्य अतिरेकी पातळीवर जपणारी मध्यमवयीन स्त्री आहे. चित्रपट तिच्या सर्वात भीषण दिवसाने सुरू होतो. ती परिचारिकेचे काम करीत असलेल्या रुग्णालयात तिच्याकडून देखभाल होत असलेल्या महिलेचा एकाएकी मृत्यू होतो. रात्रपाळी संपवून घरच्या वाटेवर रस्ता ओलांडण्यापासून सुपर मार्केटमधील खरेदीपर्यंत आडकाठय़ांचा त्रागा सोसत तिला पुढे सरकावे लागते. एकत्रित अंगावर आलेल्या अनेक संकटांना टोलवत ती घरी पोहोचते, तेव्हा घरात मोठय़ा चोरीच्या घटनेचे तापदायक प्रकरण निर्माण झालेले असते. चोरांनी दरवाजा तोडून लॅपटॉपसह तिला दररोज घ्याव्या लागणाऱ्या मानसिक स्वास्थ्यासाठीच्या गोळ्याही पळवलेल्या असतात. ती तपास घेते तेव्हा तिच्या आज्जीची तिच्याजवळ असलेल्या चांदीच्या दागिन्याची ठेवही चोरांनी लंपास केल्याचे तिला उमगते. यानंतर मात्र तिच्या दु:खाचा कडेलोट होतो.

थोडय़ाच वेळात चोरांना पकडण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्याचा महामूर्खपणा लक्षात आल्यानंतर ती स्वत:च आपल्या वस्तूंच्या शोधार्थ बाहेर पडते. शेजाऱ्यांकडे विचारपूस करताना तिची गाठ टोनी (एलाया वुड) या तिच्यासारख्याच एकटय़ा राहणाऱ्या परंतु कोणत्याही घटनेबाबत अतिपोटतिडकीने व्यक्त होणाऱ्या तरुणाशी होते. टोनीला सोबत घेऊन ती मोबाइल ट्रॅकरद्वारे आपला लॅपटॉप हस्तगत करते. यात तिला तिच्या इतर गोष्टी चोरांनी विकलेल्या ठिकाणाचा थांगपत्ता लागतो. टोनीला घेऊन ती तेथेही पोहोचते. पण आजीने दिलेला चांदीचा दागिना मिळत नाही. त्यासाठी त्या चोरांपर्यंत पोहोचणे आवश्यक बनते. रूथ आणि टोनी त्या चोरांचा छडा लावतात, पण त्यांच्यापर्यंत पोहोचताना कुठल्याच गोष्टी सरळमार्गी राहत नाहीत.

येथले चोर निष्णात नाहीत. अगदीच होतकरू अवस्थेची कात टाकून सराईत बनण्याच्या मार्गावर ते आहेत. अन् त्यातही अनंत अडचणींचे डोंगर पार करताना रूथसारख्या हेकेखोर बाईशी त्यांचा होणारा सामना सोपा राहत नाही. टोनी-रूथ छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून विजयोन्मादी अवस्थेत पोहोचतात, तर दुसरीकडे त्यांचा आनंद हिरावून घेणाऱ्या घटना घडू लागतात. एकलकोंडय़ा जगण्यातून भीषण सामाजिक तुटलेपणा अनुभवणाऱ्या व्यक्ती एकाच व्यासपीठावर आल्या तर किती गोंधळ घालू शकतात, याचा वेध दिग्दर्शक मॅकॉन ब्लेअर यांनी आपल्या या पहिल्याच चित्रपटात घेतला आहे. इथे जागोजागी तिरकस आणि बुद्धिनिष्ठ विनोद दिसतो. रूथच्या दिवसाच्या अतिवाईट सुरुवातीत ती जी रहस्य कादंबरी आत्यंतिक कुतूहलाने अध्र्यापर्यंत वाचत असते, तिथे एक वाचक येऊन त्या कादंबरीचा रहस्यस्फोट करून निघून जाण्यातला ठोसा दिग्दर्शक आणि अभिनेत्री मेलनी लिन्स्किी हिने अत्यंत टोकदार केला आहे. पहिल्यांदाच रक्त, हत्या पाहिल्यानंतर तिच्याकडून होणारा ओकाऱ्यांचा धबधबा अतिगंभीर गुन्हेप्रसंगाला विचित्र विनोदी मार्गावर नेऊन सोडतो. अन् अशा तऱ्हाईत प्रसंगांची इथे सराईत जंत्री पाहायला मिळते. न्वार चित्रपटांची अनेक वैशिष्टय़े या चित्रपटात पाहायला मिळतात. पण हा न्वार चित्रपट नाही. तो सभ्य प्रमुख व्यक्तिरेखांवर केंद्रित झालेला गुन्हेविनोदपट आहे. अध:पतित विश्वाचा या व्यक्तिरेखांचा फेरफटका प्रेक्षकांनाही नवी दृश्यचव देणारा आहे.