19 February 2019

News Flash

४५८. भाव-संस्कार

प्रत्येक जण हा भगवंतापासून दुरावल्यानं आणि ‘मी’पणात रुतल्यानं ‘दुर्जन’च झाला आहे.

कबीर महाराजांचा एक दोहा आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलया कोय। जो मन खोजा आपना तो मुझसे बुरा न कोय।।’’ जगात सर्वात वाईट कोण आहे, याचा शोध घेऊ  लागलो, तर कुणी सापडेना. अखेर मी स्वत:च्या अंतरंगात डोकावून पाहिलं तेव्हा उमजलं की, या जगात माझ्याइतका वाईट कोणी नाही! दुनियेला आपण वाईट म्हणतो.. या जगात जो-तो स्वार्थी आहे, असं म्हणतो, पण आपण काय वेगळे का असतो? या जगातला आपला प्रत्येक व्यवहार, प्रत्येक कृती ही स्वार्थप्रेरितच असते ना? तेव्हा जसं जग आहे तसेच आपणही आहोत. त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की की अशा जगाच्या किंवा या जगाचंच प्रतिरूप असलेल्या माझ्या संगतीनं एक गोष्ट साधत नाही ती म्हणजे ‘वृत्तीपालट’! कारण बाह्य़ जगातला माझ्यासकटचा  प्रत्येक जण हा भगवंतापासून दुरावल्यानं आणि ‘मी’पणात रुतल्यानं ‘दुर्जन’च झाला आहे. त्यामुळे बाह्य़ संगत असो की माझीच आंतरिक संगत म्हणजे माझ्या विचारांची, कल्पनेची, धारणेची संगत असो; ती स्वार्थी देहबुद्धीनंच माखली असल्यानं त्या संगतीच्या योगे वृत्तीपालट घडत नाही.

तेव्हा संगत ही सज्जनाचीच हवी. सज्जन म्हणजे सत् अर्थात सत्यस्वरूप अशा परमात्म्याचा निजजन. सत्याशी म्हणजेच शाश्वताशी जो सदोदित एकरूप आहे असा समाधानी भक्त. त्याच्या सहवासात जो कोणी येतो किंवा भावप्राधान्यानं त्यांच्या चरित्राचा जो मागोवा घेतो त्याच्यावर त्या परमार्थमय सज्जनाच्या पारदर्शक नि:स्वार्थ निष्काम निष्कपट निर्मोही निर्लोभी वृत्तीचा संस्कार झाल्याशिवाय राहात नाही. हैदराबादला भटजीबापू म्हणून एक थोर सत्पुरुष होते.  एकदा एकादशी दोनेक दिवसांवर आलेली आणि घरात धान्य अगदी जेमतेम उरलेलं. तेव्हा त्यांचा मुलगा काय म्हणाला? की, ‘‘बापूजी घरात काहीच उरलेलं नाही आणि द्वादशी तर जवळ आली आहे. आता एकच उपाय आहे. तो म्हणजे माझ्या पत्नीच्या सोन्याच्या बांगडय़ा आहेत त्या मोडू.’’ भटजीबापूंनी सुनेला बोलावलं आणि सर्व सांगून म्हणाले, ‘‘अगं बघ हा काय म्हणतोय ते..’’ तिनं पाटल्या मोडण्याची गोष्ट ऐकली मात्र आणि लगेच मोठय़ा उत्साहानं म्हणाली की, ‘‘जरूर मोडा या पाटल्या. त्या नुसत्या ठेवून तरी काय करायचंय?’’ आता हा प्रसंग वाचून आपल्यात दातृत्वबुद्धी नाही किंवा असलीच तर ती फार तोलूनमापून आणि आक्रसून गेली आहे, ही जाणीव जागी होऊन सलू लागल्याशिवाय राहात नाही. वरील प्रसंगाप्रमाणेच बापूसाहेब मराठे यांनी ‘श्रीमहाराजांनी बाबांना असे घडविले’ या पुस्तकात भटजीबापूंची आणखी एक गोष्ट दिली आहे. त्यांचा  मुलगा १९१८च्या सुमारास साथीच्या रोगानं मरण पावला. तो दगावल्याचं कळताच भटजीबापू म्हणाले, ‘‘कुणीही रडायचं नाही. शेवटी प्रपंच म्हणजे काय? तर, आगगाडीच्या एकाच डब्यात एकत्र बसून केलेला प्रवास! बाकी काही नाही. जो-तो आपलं स्थानक आलं की उतरतो. त्याला उतरू द्यायचं नाही का? तसं त्याचं स्थानक आलं म्हणून तो उतरला. माझं स्थानक आलं की मलाही उतरावं लागेल. तेव्हा कुणीही रडू नका. वाईट एकच वाटतं की, साधकाची अप्रतिम संगत होती, ती गेली.. पण जशी पांडुरंगाची इच्छा!’’ हा प्रसंग हृदयाच्या डोळ्यांनी वाचू लागलो तर मृत्यूकडे आणि जीवनाकडेही पाहण्याची आपली दृष्टी सुधारू लागेल! तर सज्जनांच्या प्रत्यक्ष संगतीनं वा त्यांच्या जीवन चरित्राच्या चिंतन आणि मननानं आपल्याला आपल्या वृत्तीतील उणिवांची, दोषांची जाणीव होऊ  लागते. ते दोष दूर व्हावेत, यासाठी प्रयत्नही होतात. स्वप्रयत्नानं आंतरिक सुधारणा होत नाही, या जाणिवेनं तीव्र अशी तळमळ निर्माण होते. पुढे याच संगतीच्या योगे, ‘बळें भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे!’ म्हणजे भाव, सद्बुद्धी बळावते आणि साधक सन्मार्गाला लागतो!

चैतन्य प्रेम

First Published on October 23, 2017 2:14 am

Web Title: true meaning of spiritual life