‘तू आज पुन्हा लेट केला आहेस.. मी कधीपासून थांबलो आहे बस स्टॉपवर..’ निरंजनने नेहमी प्रमाणे दिसताच क्षणी मंजिरीला बोलायला सुरुवात केली..

‘नेहमी प्रमाणे आजदेखील सॉरी.. प्लीज.. अरे तयार व्हायला उशीर होतो.. तू काय टि-शर्ट आणि जीन्स घालून लगेच रेडी होतोस..’ मंजिरीने नेहमी प्रमाणे स्वत:चा बचाव केला..

‘थोडं लवकर निघायचं.. घरातून लवकर निघालं की वेळेवर पोहोचता येतं.. कॉलेजपासून सांगतोय.. मात्र कॉलेज संपून ऑफिस सुरू झालं.. तरी तुला काही हे कळलेलं नाही..’ निरंजनचं प्रवचन सुरू झालं..

‘श्री श्री निरंजन महाराज, प्लीज हे नको.. हे मी दररोज ऐकते.. खूपदा ऐकलंय. आज नवीन काहीतरी बोला..’ मंजिरीनं निरंजनचं प्रवचन टाळण्याचा प्रयत्न केला…

‘नवीन काहीतरी..?’ निरंजननं उजव्या बाजूला पाहिलं.. ‘अरे व्वा.. आज बेस्टची नवीन बस.. चला मॅडम ऑफिसला जायला उशीर होतोय..’ निरंजन आणि मंजिरी बसमध्ये बसले..

‘नवीन काय विचारत होतीस ना..? तुझा हा टॉप नवीन आहे आणि तो तुझ्यावर खूप छान दिसतोय..’ निरंजन प्रेमाने मंजिरीकडे पाहत म्हणाला..
‘नशीब माझं.. तुझं लक्ष आहे माझ्याकडे.. अरे हा टॉप ना..’ मंजिरीचं वाक्य पूर्ण होण्याआधी निरंजन मध्येच बोलू लागला..
‘हा टॉप ना आपण पार्ल्याहून घेतला होता.. माहितीय मला.. लक्षात आहे माझ्या..’ निरंजनच्या या उत्तराने मंजिरीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं..

कॉलेजमध्ये भेटलेले निरंजन आणि मंजिरी तसे स्वभावाने बऱ्यापैकी वेगळे.. निरंजन अगदी काळजीत जगणारा.. तर मंजिरी निरंजनच्या मनावरच्या काळजीची काजळी दूर करु पाहणारी.. एकदम बिनधास्त.. मात्र बेभान आणि बेजबाबदार नसलेली.. निरंजनच्याच शब्दांमध्ये सांगायचं तर स्वतंत्र असलेली, मात्र स्वैराचारी नसलेली.. आलेला प्रत्येक क्षण मस्त एन्जॉय करायचा, भरभरुन जगायचा, अशा विचारांची मंजिरी.. निरंजन मात्र कायम उद्याचा विचार करणारा.. म्हणजे मंजिरीनं म्हटलं की उद्या लेक्चरला नको बसूया.. की निरंजनाच्या विचारांची गाडी थेट भविष्याच्या स्टेशनवर जाऊन पोहोचायची.. उद्याच्या लेक्चरला नाही बसलं आणि नेमकं उद्याचं शिकवलेलं परीक्षेत आलं तर.. मार्क जातील.. ग्रेड कमी होईल, वगैरे वगैरे..

आजचा विचार करणारी मंजिरी आणि उद्याचा विचार करणारा निरंजन, असं कॉम्बिनेशन फार काही काळ टिकेल, असं कॉलेजमध्ये कुणालाही वाटलं नव्हतं.. मात्र मंजिरीनं सर्वकाही व्यवस्थित हँडल केलं.. अनेकदा भांडण होऊन दोघांनी अबोला धरला की मंजिरीच पुढाकार घ्यायची.. त्यामुळे हे नातं टिकवण्यात मंजिरीचा मोठा वाटा होता..

मंजिरी आणि निरंजन बसने बोरिवली स्टेशनला पोहोचले.. मग त्यांनी चर्चगेटकडे जाणारी फास्ट ट्रेन पकडली.. बोरिवली स्टेशनवरुन सुटणाऱ्या फास्ट ट्रेनमध्ये बसल्यावर पुन्हा मंजिरी आणि निरंजनच्या गप्पा सुरू झाल्या..
‘मग आज तरी वेळेत निघणार का ऑफिसमधून?’ मंजिरीने निरंजनला विचारलं.. कारण आदल्या दिवशीच निरंजन दोन तास उशीरा निघाला होता.. मीडियामध्ये काम करत असल्यानं ऑफिसमधून वेळेत निघणं निरंजनसाठी प्रचंड कठीण असायचं..
‘इलेक्शनचे रिझल्ट्स होते मॅडम.. दिवसभर लाईव्ह.. त्यानंतर विश्लेषण.. असं सगळं करण्यात वेळ गेला.. आज निघेन वेळेत.. कदाचित..’ निरंजन म्हणाला..

‘मला वाटलंच होतं तुझं वाक्य या कदाचित शब्दावरच संपणार म्हणून.. आपण फिरायला जायचं का शनिवारी..? मला सुट्टी आहे, तुला पण सुट्टीच आहे ना..? चल ना मस्त कुठेतरी बाहेर जाऊ..’ मंजिरीच्या डोक्यात मस्त काहीतरी प्लान शिजत होता..

‘डोक्यात काहीतरी छान प्लान शिजतोय तुझ्या.. पण या शनिवारी शक्य नाही.. कारण एक महत्त्वाची मिटिंग आहे ऑफिसमध्ये..’ निरंजन लगेचच म्हणाला..

‘मग पुढच्या आठवड्यात जाऊया..?’ मंजिरीने लगेच पुढचा प्रश्न केला..

‘पुन्हा एकदा सॉरी..’ निरंजन लगेचच म्हणाला..

‘आता काय..?’ मंजिरीचा चेहरा पडला होता..

‘तुला मी शिफ्ट शेड्युअल पाठवलंय या महिन्याचं.. पाहिलं नाही..? ११ मार्च.. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल..’ निरंजन मंजिरीला आठवण करुन देत होता..

‘म्हणजे तू ७ वाजल्यापासून ऑफिसमध्ये असणार.. खूप उशीरा निघणार आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाणार.. बरोबर ना..?’ मंजिरीने निरंजनचं संपूर्ण शेड्युल सांगितलं.. निरंजननं होकारार्थी मान डोलावली..

‘म्हणजे तुझी शनिवारची एक सुट्टी गेली.. ती काय तुला पुढे मिळणार नाही.. सुट्टी गेली आणि प्लानदेखील गेला..’ मंजिरी खूपच नाराज झाली..

‘प्लीज समजून घे ना.. आपण ११ मार्चनंतरच्या शनिवारी जाऊ ना.. आणि तूच म्हणतेस ना आजचा दिवस एन्जॉय करायचा असतो.. उद्याचा विचार का..?’ निरंजनने मंजिरीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला..

‘माझ्यात ना निरंजन शिरला आहे.. म्हणून मी उद्याचा विचार करतेय.. तुझ्या अंगात मंजिरी आलीय का..? आजच्या दिवसाच्या इतक्या प्रेमात पडायला..?’ मंजिरी गोड हसली..

‘मी दिवसाच्या प्रेमात नाहीय.. मी तुझ्या प्रेमात आहे.. अगदी आकंठ..’ निरंजननं रोमँटिक होण्याचा प्रयत्न केला..

‘ऑफिसला जा आणि कामं करा.. आकंठ प्रेमात आहे म्हणे..’ रोमँटिक निरंजनला मंजिरीनं उत्तर दिलं.. गप्पांच्या ओघात ट्रेन चर्चगेटला पोहोचली होती.. मंजिरी आणि निरंजननं एकमेकांना बाय केलं.. दोघेही आपापल्या ऑफिसच्या दिशेनं निघाले..

निरंजन आणि मंजिरी मस्त कपल होतं.. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम.. पण निरंजन उद्याचा प्रचंड विचार करायचा.. करिअरला सुरुवात केल्यानंतर अवघ्या तीन वर्षांमध्ये घर घेतलं होतं.. त्यावेळी मंजिरीला खूप आनंद झाला होता.. त्या आनंदाच्या भरात तिनं ही गोष्ट स्वत:च्या घरीदेखील सांगितली होती.. दोघांच्या घरी या नात्याबद्दल कल्पना नव्हती.. मात्र मंजिरीच्या घरचे निरंजनला ओळखायचे..

मंजिरीला निरंजननं घेतलेल्या घराचा आनंद होता.. आणि निरंजनला ईएमआयचं टेन्शन.. आता वर्षभरात नोकरी बदलायला हवी.. अन्यथा ईएमआय जाऊन हाती काय उरणार..? थोड्या वर्षांनी लग्नदेखील करायचं आहे.. त्यात खूप खर्च होणार.. सध्या जे काही पैसे अकाऊंटला आहेत, त्यातले बरेचसे घराच्या पझेशनवेळी संपणार.. मग पुढचं कसं होणार..? त्यामुळे आता नवी नोकरी शोधायला हवी.. वर्षाच्या अखेरपर्यंत मिळेल का नोकरी..? निरंजन कायम या प्रश्नांच्या जाळ्यात अडकलेला असायचा.. निरंजनला कायम उद्याची चिंता..

नेहमी उद्यामध्ये जगणाऱ्या निरंजनला भविष्यकाळातून थेट वर्तमानकाळात आणण्याचं काम मंजिरी अगदी व्यवस्थित करायची.. कायम उद्याच्या जंजाळात अडकलेल्या निरंजनने आज एन्जॉय करावा, यासाठी मंजिरी प्रयत्न करायची..

दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यावर संध्याकाळी निरंजन आणि मंजिरी पुन्हा भेटले.. मंजिरी आधीच चर्चगेट स्टेशनला पोहोचली होती.. काही वेळाने निरंजन पोहोचला..

‘खूप वाट पाहायला लागली का?’ निरंजनने आल्या आल्या विचारलं..

‘नाही रे.. फक्त अर्धा तास..’ मंजिरी म्हणाली..

‘काय..? अर्धा तास..?’ निरंजनला वाईट वाटलं होतं..

‘ठिक आहे रे.. तू नाही सकाळी माझी वाट पाहात होतास बस स्टॉपवर..’

‘सकाळी मीच लवकर पोहोचलो होतो स्टॉपवर..’

‘तू ना सगळीकडेच लवकर पोहोचतोस.. सर्वकाही लवकर असतं तुझं.. नोकरी पण अगदी कॉलेज झाल्या झाल्या मिळवली.. कॉलेजमधल्या इतर फ्रेंड्सपेक्षा लवकर.. मग घरदेखील लवकर.. अवघ्या २३ व्या वर्षी..’ कमी वयात आयुष्यात बरंच काही मिळवणाऱ्या निरंजनचं मंजिरीला कौतुक होतं.. मात्र भविष्याचा इतकादेखील विचार निरंजननं करु नये, असं मंजिरीला वाटायचं..

‘आता काय करणार..? तुझ्यासारखं नाही ना जगायला जमत मला.. पण आवडेल तुझ्यासारखं जगायला.. प्रत्येक क्षण अगदी भरभरुन, मनसोक्त जगतेस तू.. हो ना मंजिरी..?’ निरंजन कौतुकानं म्हणाला..

‘अरे ईएमआयचं टेन्शन घेऊन ईएमआय कमी होणार आहेत का? उलट त्यामुळे टेन्शन वाढेल.. तू स्वत:वर विश्वास ठेव.. आणि नोकऱ्या बदलण्यात तू हुशार आहेस.. कामाच्या बाबतीत इतका प्रामाणिक आहेस की ऑफिसमध्ये असताना मला फोन करायलादेखील तुला वेळ नसतो.. त्यामुळे आयुष्य असं ईएमआयच्या स्वरुपात जगणं सोड रे.. चांगल्या माणसांसोबत कायम चांगलंच होतं.. पगार काय वाढेल रे.. कामाच्या जोरावर दुसरी नोकरीदेखील मिळेल.. आत्तापर्यंत नाही का मिळाल्या..? इतक्या प्रामाणिक आणि टॅलेंटेड व्यक्तीला कोण नाकारेल..?’ मंजिरीचं बोलणं निरंजनला पटत होतं..

मंजिरीमुळे हळूहळू निरंजन वर्तमानात जगू लागला.. उद्याचं प्लानिंग करायला हवं.. मात्र ते इतकंही नको की त्यामुळे आज जगायला, आज एन्जॉय करायला वेळच मिळू नये, हे निरंजनला पटलं होतं.. नेहमी सुट्टीच्या दिवशी घरीच बसून असणारा निरंजन आता मंजिरीसोबत बाहेर जायचा.. तो दिवस मजेत घालवायचा.. श्वास सुरू असणं म्हणजे जगणं नव्हे.. प्रत्येक श्वास, त्यासोबतचा प्रत्येक क्षण भरभरुन जगणं, याला खरं जगणं म्हणतात, असं मंजिरी एकदा म्हणाली होती.. ते वाक्य निरंजननं कायम लक्षात ठेवलं..

निरंजनमधला बदल खूपच सुखद होता.. नेहमी चेहऱ्यावर प्रश्न घेऊन चालणारा निरंजन आता त्या प्रश्नांची उत्तरं शोधून जास्तीत जास्त आनंदात राहण्याचा प्रयत्न करायचा.. मंजिरीमुळे हे सर्व शक्य झालं होतं.. मंजिरीनं निरंजनला एक सकारात्मकता दिली होती.. निरंजन आणि मंजिरीचं आयुष्य अगदी सुरळीत चाललं होतं.. मात्र अचानक मंजिरी आणि निरंजनचं भेटणं कमी झालं.. दररोजचं भेटणं तर बंदच झालं.. नेमकं काय झालंय, हे निरंजनच्या लक्षात येत नव्हतं..

क्रमश:

 

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित