मागच्या आठवडय़ात मी त्या समारंभाच्या ठिकाणी आपण वाचकांना घेऊन पोचलो, हे आपल्याला आठवत असेल. (कदाचित नसेलही. कारण माझा प्रत्येक शब्द म्हणजे काही वज्रलेख नव्हे. आठवत नसल्यास तो अंक घेऊन वाचा. किंवा वाचावा, ही विनंती.) समारंभाच्या ठिकाणी पोचल्यावर ‘सावळागोंधळ’ यापलीकडे दुसऱ्या कुठल्याही शब्दांनी वर्णन करता येणार नाही अशी परिस्थिती ओढवलेली असते. (चतुरंग किंवा अजून एक-दोन संस्थांचे कार्यक्रम वर्षांनुवर्षे अत्यंत शिस्तबद्धरीतीने कायम पार पडत आलेले आहेत. पण ते अपवाद म्हणजे नियम नव्हे, हे सिद्ध करण्यापुरतेच!) कार्यक्रमाला जी गाडी आपल्याला घेऊन निघते ती चुकीच्या ठिकाणी उभी केली जाते. आपण बाहेर पडतो तोच ‘‘अरे! ए! तो हा.. काय त्याचं नाव? तो येईल कुठल्याही क्षणी.. च्यायला! फार कटकट करतो काय तो? मागच्या वेळेला कोण आली होती ती?’’

‘‘कोण हो?’’

youths cheated,
परदेशात नोकरीच्या आमिषाने दिडशे तरुणांची फसवणूक, नवघर पोलिसांकडून टोळीतील तिघांना अटक
Loksatta samorchya bakavarun BJP Prime Minister Narendra Modi Highest Tribute to Congress Manifesto
समोरच्या बाकावरून: मोदींनी दिली काँग्रेसला मानवंदना!
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

‘‘कोण काय? ती कुठल्याशा मालिकेतली अनुराधा का फनुराधा कोण ती! कोमट पाणी मागितलं होतं प्यायला! साला! पंधरा मिनिटाच्या भाषणाला कोमट पाणी? कुठून आणणार आयत्या वेळी? शेवटी आपल्या सलूनमधून एका गिऱ्हाईकासमोरची दाढीची वाटी आणली ओढून आणि ओतली तिच्या घशात..’’ वगैरे शब्द आपल्या मनाविरुद्ध आपल्याला ऐकू येतात आणि इथे पाणीही प्यायचं नाही असं मनाशी पक्कं करावं लागतं.

‘इथे थोडा वेळ बसा!’असं म्हणून कोणीतरी संबंधित व्यक्ती कोपऱ्यातल्या खुर्चीकडे बोट दाखवून नाहीशी होते. काही मुलं आणि मुली एखाद्या प्राणिसंग्रहालयातल्या नव्याने दाखल केलेल्या जनावराकडे बघावे तशी डोकावून बघायला लागतात. त्यातले काही इरसाल अत्यंत भोळसट चेहरा करत (हे खोटे चेहरे सवयीने ओळखता येतात.) आपल्याकडे सही किंवा हल्लीच्या प्रथेप्रमाणे सेल्फी मागायला येतात. सेल्फी काढल्यानंतर असं कळतं- की बहुतेक वेळा आपण त्यात नसतोच.

त्यांचे ते सगळे सोपस्कार होईपर्यंत बराच वेळ जातो. नंतर काही पुस्तकांचे ढीग समोरच्या खुर्च्यावर रचायला सुरुवात होते. (संस्थेचा अहवाल!) हळूहळू आजूबाजूच्या खुर्च्या भरून जातात आणि उरलेल्या पुस्तकांसाठी आपल्याला बसलेली खुर्ची रिकामी करून द्यावी लागते.

‘‘अरे! याला आत्ताच कशाला बोलावला? साला नंतर आला असता तर?’’

‘‘अहो! भाई! मला काय, आपण हुकमाचे ताबेदार माणूस! आणा सांगितलं आणा! दगड आणायला सांगितलं- आणा!’’ सुदैवाने तितक्यात काही माणसं येतात आणि आपल्याला जवळच्या एका कचेरीत नेतात. कचेरीच्या भिंतींवर दादासाहेब, अण्णासाहेब, मामासाहेब छापाच्या काही नेत्यांचे सुकलेला हार असलेले फोटो असतात. काही वेळाने एक उत्साही कार्यकर्ता येऊन नवे हार त्या फोटोंना घालतो. बाजूचा एक माणूस ‘‘आधी अण्णाला, मग मामा. दादाला नाही घातलास तरी चालेल. जिवंत होता तेव्हा किती लोकांना याच्यामुळे हार घातलेत आम्ही, ते तुला कळणार नाही..’’ या शब्दात त्या फोटोधारी व्यक्तींची नकळत ओळख करून देतो. इकडे आपल्याला बोलावलेला हा कार्यक्रम नेमका कधी सुरू होणार याचा अंदाज येत नाही. विचारलं तर ‘‘काळजी करू नका! वेळेवर मोकळं करतो तुम्हाला. अहो! आम्हालाही कामं आहेत उद्या! रिकामे नाही बसलोय.’’ यावरचा हशा दाबण्यासाठी ‘‘फारच नावाजलेली आहे तुमची संस्था.. नाही?’’

‘‘काय सांगणार? हा नाम्या (म्हणजे कार्यक्रम पत्रिकेवर ज्याचे नाव ठळकपणे छापलेले असते तो. ‘तो’ नाही ‘ते’! आपण कशाला उगाच कुणाला नावं ठेवा!) म्हणजे (हारवाल्या फोटोकडे बोट दाखवत) या अण्ण्याचा पोरगा-सगळा मलिदा खातो. नावाला सामाजिक सेवाभावी संस्था. सगळा सावळागोंधळ आहे. तीन वर्षांपूर्वी हातकडय़ा घालून नेला होता. पण सुटला.. सगळी खाबूगिरी हो.’’ इतक्यात सगळीकडे गडबड उडते आणि पाठोपाठ मग्रुरीशिवाय दुसरा कुठलाही भाव उमटणार नाही अशा चेहऱ्याचा एक इसम येतो. अंगात उत्तम कपडे. पण रंगसंगती भीषण असते. हातात सोन्याचं कडं असतं. गळ्यात तीनहून जास्त माळा असतात. बोटात अंगठय़ांचा खच पडलेला असतो.

‘‘सगळं ठीक झालं ना? कसला काय त्रास?’’ तो रठ्ठ आवाजात विचारतो.

‘‘नाही! नाही! भाऊ साहेब! आपण असताना कसला त्रास?’’ भलताच कोणीतरी उत्तर देतो.

‘‘नाही! हल्ली लोकांना आमचाच त्रास होतो..’’ भाऊ साहेब उद्गारता होतो.

या वाक्यावर प्रचंड हशा पिकतो.(राजकारणी लोकांच्या विनोदावर हसण्यासाठी एखादा कोर्स असेल तर कोणी सांगेल का?) थोडक्यात, भाऊसाहेब म्हणजे अण्ण्याचा नाम्या- इतके कळते.

‘‘चला! उरकून घेऊ ! पुढच्या कामांना जायचंय.’’

भाऊ साहेब ऊर्फ नाम्या यांना दुसरीकडे जायची घाई असते. त्यामुळे आतापर्यंत संथगतीने चाललेल्या सगळ्यांना गतिमान व्हावे लागते. व्यासपीठावर जाण्याचा मार्ग भलताच कठीण असतो. भाऊ साहेबांना हात द्यायला चारजण पुढे होतात. आपल्याला कोण..? त्यामुळे लडबडत वपर्यंत पोचावे लागते. समोर शेकडो माणसं तळमळत बसलेली असतात. व्यासपीठावर बसायच्या खुर्च्या आणि मी यांचे फार पूर्वीपासून वैर आहे. काही झाले तरी मला नेहमी दोन टेबलांची जोडच येते. त्यामुळे पाय लांबवून बसावे लागते. बसतो- न बसतो तोच दीपप्रज्ज्वलन करायची विनंती निवेदक करतो. बाजूला निवेदन गळत असते. ‘आजचा हा मंगल दिन सोनगाव तालुक्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. आज मोनेसाहेब यांचे पाय आपल्या गावाला लागले, हा एक दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा! आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की ते मराठी शब्दसरितेच्या गळ्यातले एक ताईत आहेत. त्यांच्या बाबतीत मला म्हणावेसे वाटते की, जरी वाढला एरंड, तरी होईल का तो इक्षुदंड?’’ यावर काही न कळल्याने सगळ्यांच्या टाळ्या वाजतात. इतक्यात नामदेव त्या सोनगावच्या साहित्यिकाच्या उत्साहावर पूर्णपणे पाणी फिरवत सगळ्यांना ऐकू जाईल अशा खणखणीत स्वरात ‘‘ए! बास कर की! फुडचं बोल की!’’ असे म्हणून वर माझ्या कानात ‘‘फार बोलतो! मागच्या महिन्यात ते कोणतरी आले होते, त्यांना पण हेच म्हणला व्होता.’’ यावरून आमच्या व्यवसायातले अनेक इक्षुदंड न होऊ  शकणारे एरंड त्या गावी आपले पाय लावून गेले आहेत, इतकंच कळतं. नंतर अत्यंत हातघाईवर येऊन सत्कार समारंभ उरकला जातो. कधी कधी आपल्या गळ्यात पडलेला हार दुसऱ्याला घालायचा असतो. मग सगळ्यांसमोर तो उतरून दुसरा आपल्या गळ्यात घातला जातो. मग तो अण्ण्याचा नाम्या आपली भलीमोठी गाडी घेऊन निघून जातो. तणावपूर्ण वातावरण निवळते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते. ‘पाहुण्यांचा परिचय’मध्ये आपण न केलेले चित्रपट आणि नाटकं आपल्या खात्यात टाकली जातात. मग प्रास्ताविक होते. म्हणजे काय, ते मला कधीच कळले नाहीये. त्यानंतर अहवाल वाचन होते. त्यात कुणालाही रस नसतो. संस्थेच्या स्थापनेपासून आजच्या तारखेपर्यंत सगळा इतिहास वाचला जातो. किती बाकं खरेदी केली, कुठल्या प्रयोगशाळा बांधल्या गेल्या, वगैरे सगळं अत्यंत रटाळ आवाजात सांगितलं जातं. खरंच, याची गरज आहे का? कारण ऐकणाऱ्या सगळ्यांना ते माहीत असतं. आणि मी काही किती बाकं खरेदी झाली, या माहितीसाठी तिथे आलेलो नसतो. शिवाय हे सगळं छापील पुस्तकातून वाचलं जातं. म्हणजे समोरचे सगळे निरक्षर असतात की काय? हळूहळू अहवाल वाचन संपतं आणि पुरस्कार वितरणाला सुरुवात होते. गुरं हाकल्यासारखी मुलं रंगमंचावर आदळली जातात. कधी कधी एकाच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्याच्या हाती लागतो. लक्षात आणून दिलं तर त्यावर ‘‘जाऊ  दे हो सर! नंतर ते बघून घेऊ . आता उरका!’’ शेवटचे शेवटचे पुरस्कार तर जवळजवळ विजेत्यांच्या अंगावर भिरकावले जातात. सगळं झालं की अर्धेअधिक लोक उठून जातात. आणि उरतात ते सगळे म्हातारेकोतारे किंवा संस्थेचे चपराशी! त्यांना आपण मार्गदर्शन करावे, अशी सूचना केली जाते. काय बोलणार? पण काहीतरी बोलावेच लागते. तसे काहीतरी बोलून मी भाषण आवरतं घेतो. मग आभार प्रदर्शन होऊन सगळे उठून जातात. त्या संस्थेच्या मूळ पुरुषाचा चेहरा असलेली एक पत्र्याची मूर्ती आपल्या हातात कोंबली जाते. ती मुंबईपर्यंत वागवत न्यावी लागते. त्याबरोबर हार, नारळ आणि मुंबईच्या हवेला संपूर्ण निरुपयोगी असलेली एक लोकरीची चिंधीवजा शाल (ती देताना ‘महावस्त्र’ असा तिचा उल्लेख होतो.) असते. ती तिथल्या कापडाच्या दुकानातून घेतलेली असते. तो दुकानदार जाता जाता ‘‘साहेब! मुलीच्या लग्नाचा बस्ता आमच्याकडूनच घ्या. पाच टक्के डिस्काऊंट देऊ,’’ असे सांगतो. मी माझं शहर सोडून कापड खरेदीला तिथे का जाईन?

शेवटी सगळे पुन्हा मूळ हॉटेलवर येतो. इकडे जायची गाडी पंधरा मिनिटांवर आलेली असते. त्यात पुन्हा मंडळाच्या सदस्यांबरोबर खास फोटो सेशन होते. शेरेबुकात अभिप्राय लिहावा लागतो. आपल्याआधी आलेल्या लोकांचे ते शेरे वाचून जगात खूप चतुर माणसं आहेत याची जाणीव होते. मग एका कोपऱ्यात नेऊन चोरीचा व्यवहार केल्यासारखे पैशाचे पाकीट दिले जाते. कधी कधी त्यावर ‘बारणे मंडपवाले’ असा मजकूर खोडून आपले नाव टाकलेले स्वच्छ वाचता येते. गाडीला दोन-तीन मिनिटं असताना आपल्याला स्टेशनवर अक्षरश: सोडून दिले जाते. पोटात भुकेचा वणवा पेटलेला असतो. आणि आपल्या बोगीचा नंबर शोधत आपण हातात असंख्य जिनसा घेऊन सैरावैरा पळत असतो..

संजय मोने

sanjaydmone21@gmail.com