दिव्यातील अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त श्याम थोरबोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी दिवा भागातील अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने मंगळवारी दिवा भागात कारवाई करून आठ बांधकामे भुईसपाट केली असून सुमारे ५० टन बांधकाम साहित्य जप्त केले आहे.
दिवा भागातील तळ अधिक चार मजल्याची ३० हजार चौरसफुट क्षेत्रफळाची इमारत, तळ अधिक तीन माळ्याची २५ हजार चौरसफुट क्षेत्रफळाची इमारत, तळ अधिक एक मजल्याची १५ हजार चौरसफुट आणि तळ अधिक मजल्याची आठ हजार चौरसफुट क्षेत्रफळाची इमारत, या इमारतींच्या बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली. तसेच तळ मजल्याचे बांधकाम पुणई करून पहिल्या माळ्याचे बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारतींचे बांधकाम पुर्णपुणे जमीनदोस्त करण्यात आले. आठ ठिकाणी सुरू असलेल्या प्लींथच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली असून सुमारे ५० टन बांधकाम साहित्य जप्त करण्यात आले आहे.  दरम्यान, दिवा येथील अनधिकृत बांधकामाविरुद्ध २८ जानेवारीपासून विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून त्यासाठी पाच विशेष पथक तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली.