राज्यात १५ ते २० भागांत लवकरच शुभारंभ, मराठी चित्रपटांना नवा दिलासा

जगात सर्वाधिक चित्रपट भारतात तयार होत असले तरी चित्रपटगृहांची संख्या सर्वात कमी असल्याने वितरणाच्या कोंडीत रखडत असलेल्या अनेक मराठी चित्रपटांना आता नवा आधार मिळणार आहे तो घडीच्या फिरत्या आणि वातानुकूलित चित्रपटगृहांचा! राज्यात विदर्भातील काही भागांप्रमाणेच १५ ते २० भागांत लवकरच ही चित्रपटगृहे रसिकांच्या सेवेत दाखल होत आहेत.

सध्या शहरांपलिकडे गावखेडय़ांतही चित्रपटगृहांची संख्या वाढविण्याची खरेतर गरज आहे. मात्र ती गोष्ट प्रत्यक्षात येण्यासाठी मोठा कालावधी आणि मोठी आर्थिक तरतूद आवश्यक आहे. ही कोंडी आता या नव्या फिरत्या चित्रपटगृहांमुळे फुटणार आहे.देशातील पहिले अद्ययावत फिरते चित्रपटगृह उभारणाऱ्या ‘पिक्चर टाइम’ने कमीतकमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत कुठेही उभारता येईल अशा पध्दतीचे डॉल्बी साऊंड, टुके फॉर्मेट प्रोजेक्शन असलेले वातानुकूलित फिरते चित्रपटगृह विकसित केले आहे. सर्वसाधारणपणे एक चित्रपटगृह  उभारण्याचा खर्च हा ३० कोटी रुपयांच्या आसपास असतो. आम्ही १० लाख ते एक कोटी रुपये खर्च करून या चित्रपटगृहांची यंत्रणा विकसित केली आहे, अशी माहिती ‘पिक्चर टाइम’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील चौधरी यांनी दिली.

या फिरत्या चित्रपटगृहासाठी सहज उभारता येईल आणि पुन्हा बंद करून एका जागेवरून दुसऱ्या जागी नेता येईल, अशा तंबूची निर्मिती करणे हे मोठे आव्हान होते. अशाप्रकारे अग्निरोधक, वातानुकूलित यंत्रणा बसवता येईल अशा तंबूची रचनाही आम्ही केली असल्याने हे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान असल्याचा दावा चौधरी यांनी केला.

या चित्रपटगृहात एकावेळी १२० प्रेक्षक बसू   शकतील आणि फक्त अडीच तासांत हे चित्रपटगृह कुठल्याही ठिकाणी सहज उभे करता येईल. शिवाय, १२० खुर्च्या, प्रोजेक्टर, वातानुकूलित यंत्रणा, डॉल्बी साऊंड यंत्रणा हे सगळे सामान फक्त एका ट्रकमध्ये बसेल अशा पद्धतीने युनिटची रचना करण्यात आली आहे. इतर चित्रपटगृहांचा व्यवस्थापन खर्च दरमहा १२ लाख रुपयांच्या आसपास आहे, या चित्रपटगृहासाठी दरमहा साडेपाच ते सहा लाख रुपये एवढा खर्च येतो, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या छत्तीसगड, तेलंगण, मध्य प्रदेश अशा ठिकाणी हे डिजिटल फिरते चित्रपटगृह कार्यरत आहे.  पुढच्या वर्षीपर्यंत देशभरात शंभर डिजिटल मोबाइल चित्रपटगृहे धावणार आहेत.

ही फिरती चित्रपटगृहे देशभरात तालुकास्तरावरच कार्यरत राहणार आहेत, त्यासाठी त्या त्या गावातील ढाबा, हॉटेल, चहावाला, मोठे दुकानदार यांच्या मदतीने ऑनलाइन तिकीटविक्री यंत्रणा विकसित केली जाते. याचा सर्वाधिक फायदा हा प्रादेशिक चित्रपटांना होणार असून महाराष्ट्रात नवीन मराठी चित्रपट, प्रेक्षकांच्या मागणीनुसार दर आठवडय़ाला प्रदर्शित होणारे हिंदी चित्रपट, ‘सैराट’सारखा एखादा लोकप्रिय चित्रपट या माध्यमातून दाखवले जातील, असे चौधरी यांनी सांगितले.

चित्रपट व्यवसायाच्या वाढीसाठी  चित्रपटगृहांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. आपल्या देशात फक्त ११ हजार चित्रपटगृहे आहेत, अमेरिकेत हेच प्रमाण ३० कोटी लोकांसाठी ४२ हजार चित्रपटगृहे एवढे आहे. चीननेही आपली चित्रपटगृहांची संख्या दुपटीने वाढवली असल्याने आपल्याकडच्या हिंदी चित्रपटांना तिथे कमाई करता येते आहे. या नव्या प्रयोगामुळे गावागावांत चित्रपट पोहोचेल आणि याचा सर्वाधिक फायदा प्रादेशिक चित्रपटांना होईल.

–  उज्ज्वल निरगुडकर, तांत्रिक सल्लागार, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय