पालिकेच्या विनंतीला ‘बेस्ट’कडून प्रतिसाद नाही

वारंवार कारवाई केल्यानंतरही बेस्टच्या बसथांब्यांची फेरीवाल्यांच्या कब्जातून सुटका होत नसल्यामुळे पालिका अधिकारी हैराण झाले आहेत. या फेरीवाल्यांना बसथांब्यांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कडक शासन करण्यासाठी बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत संयुक्त कारवाईत सहभागी व्हावे यासाठी पालिकेने बेस्टला विनंती केली आहे. संयुक्त कारवाईमुळे वीजचोरीला आळा बसेल, फेरीवाल्यांच्या ताब्यातून बसथांब्यांची सुटका होईल आणि दंडात्मक कारवाईअंती बेस्टच्या तिजोरीत महसुलाची भर पडेल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे; मात्र पालिकेला बेस्टकडून अद्याप कोणतेच संकेत मिळालेले नाहीत.

बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांचा ऊन आणि पावसापासून बचाव व्हावा यासाठी बेस्टने कोटय़वधी रुपये खर्च करून मुंबईत अनेक ठिकाणी आकर्षक असे लोखंडी बसथांबे उभे केले आहेत. मात्र अनेक ठिकाणचे बेस्टचे बसथांबे फेरीवाल्यांनी ताब्यात घेतले आहेत. तर काही ठिकाणी गर्दुल्ले, समाजकंटक आदींनी बसथांब्यांच्या छपरावर बस्तान बसवले आहे. रात्री-अपरात्री सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर झोपणाऱ्यांना पोलीस हटकत असून पोलिसांच्या दृष्टीस पडू नये म्हणून काही जण रात्री काही ठिकाणच्या बसथांब्याच्या छपरावर झोपत असल्याचे आढळून आले आहे. दिवसभर  सामान बसथांब्याच्या छपरावर ठेवून ही मंडळी कामाला जात असून रात्री परतल्यावर छपरावर मुक्काम ठोकत आहे.

या संदर्भात बेस्टने तक्रार केल्यानंतर अथवा ही बाब पालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत बसथांबे अतिक्रमणमुक्त केले जातात. मात्र एकदा कारवाई केल्यानंतर दोन-तीन दिवसांनंतर फेरीवाले पुन्हा बसथांब्यावर आपली दुकाने थाटत आहेत. वारंवार कारवाई केल्यानंतरही बसथांब्यांची फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून सुटका होत नाही. त्यामुळे अनेक वेळा कारवाई करणारे पालिका अधिकारी  हैराण झाले आहेत. बसथांब्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी बेस्टनेही पालिकेला मदत करावी असे विनंतीपत्र पालिका अधिकाऱ्यांनी बेस्टला पत्र पाठवून केली आहे. बसथांब्यावर आपला व्यवसाय थाटणारे फेरीवाले आजूबाजूच्या दुकानातून वीजपुरवठा घेत असून त्याच्या बदल्यात संबंधित दुकानदारांना पैसे दिले जातात. विजेची पुनर्विक्री हा चोरीचा प्रकार असून पालिकेला याबाबत कोणतीही कारवाई करता येत नाही.

परिणामी, बेस्ट आणि पालिकेने बसथांबे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी संयुक्त कारवाई करावी. त्यासाठी बेस्टने आपले अधिकारी-कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. तसेच बसथांबे अतिक्रमणमुक्त केल्यानंतर तेथे पुन्हा फेरीवाले घुसखोरी करणार नाहीत यावर लक्ष ठेवण्यासाठी बेस्टने भरारी पथक स्थापन करावे.

म्हणजे बसथांबे फेरीवाल्यांच्या कचाटय़ातून मुक्त होऊ शकतील आणि विजेची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करता येईल. बेस्टची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. वीजचोरी पकडल्यानंतर बेस्टच्या तिजोरीत जमा होणारा महसूल बेस्टला तोटय़ातून बाहेर पडण्यासाठी खारूताईचा वाटा ठरू शकेल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या पत्रप्रपंचाला बेस्टकडून कोणतेच उत्तर मिळालेले नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

 

बेस्टने तक्रार केल्यानंतर बसथांब्यावरील अतिक्रमण हटविण्यात येते. पण काही दिवसांमध्येच फेरीवाले पुन्हा बसथांब्याचा ताबा घेतात. बसथांब्याची देखभाल करण्याची यंत्रणा बेस्टने उभी केल्यास ते अतिक्रमणमुक्त राहू शकतील आणि वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून बेस्टला महसूलही मिळू शकेल.

– उदयकुमार शिरुरकर, साहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय