Gold Jewellery Price Is Calculated In India : अक्षय्य तृतीयाचा सण आता जवळ आला आहे आणि भारतीय परंपरेनुसार या दिवशी बरेच जण सोनं खरेदी करतात. हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सराफा बाजारामध्ये मोठी उलाढल असते. कोट्यवधी रुपयांची सोन्याची खरेदी-विक्री होते. याशिवाय लग्नाचा हंगाम असल्यानेही सोनंखरेदीतया काळात वाढ अपेक्षित असते. दागदागिन्यांची खरेदी करण्याच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करणे हे आपल्या देशात लोकप्रिय आहे. सोन्याचे दागिने वापरायला प्रत्येकालाच आवडतात. पण तुम्हाला माहितीये का, भारतात सोन्याचे दर कसे ठरविले जातात? खरेदीदार म्हणून तुम्ही खरेदी केलेल्या दागिन्यांचे दर कसे ठरतात, हे जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर आजच्या लेखात आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

भारतात सोन्याची किंमत कशी ठरते?

दागिन्यांची किंमत शुद्धता, घडणावळ, सोन्याचे वजन आणि जीएसटी यांवर सोन्याची किंमत निश्चित केली जाते. गोल्ड असोसिएशनने ठरवून दिलेल्या दैनंदिन सोन्याच्या दरानुसार दररोज सकाळी सोने व्यापारी आणि किरकोळ विक्रेते काम करतात. फोर्ब्सच्या अहवालानुसार, प्रत्येक शहरात सोने व्यापाऱ्यांची स्थानिक संघटना असते, जी दररोज सोन्याचे दर जाहीर करते.

म्हणूनच प्रत्येक शहरात सोन्याच्या समान वजनाच्या वस्तूंच्या किमती वेगवेगळ्या असतात. संपूर्ण शहरांतील किमतींमध्ये थोडासा फरक असतो, कारण इतर काही प्रमुख घटक आहेत, जे दागिन्यांच्या किमतीवर परिणाम करतात. जसे की, मेकिंग चार्जेस, कर आणि सोन्याची शुद्धता. म्हणूनच दागिन्यांची शेवटची किंमत मोजण्यासाठी ज्वेलर्स कोणते सूत्र वापरतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सोन्याची किंमत मोजण्यासाठी वापरलेले सूत्र :

दागिन्यांची अंतिम किंमत = सोन्याची प्रति ग्रॅम किंमत (२२ कॅरेट किंवा १८ कॅरेट) X (ग्रॅममध्ये वजन) + मेकिंग चार्जेस/ ग्रॅम + वस्तू आणि सेवा कर (GST) शिवाय (दागिन्यांची किंमत + मेकिंग चार्जेस). अशाप्रकारे भारतात सोन्याची किंमत मोजली जाते. खाली नमूद केलेले उदाहरण तुम्हाला हे सूत्र अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करू शकते.

उदाहरणार्थ, ज्वेलर्सने ठरवलेला सोन्याचा दर खालीलप्रमाणे आहे.

१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत = ३०,००० रुपये

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत = ३, ००० रुपये

सोन्याच्या वस्तूचे वजन : २० ग्रॅम

मेकिंग चार्ज = रु. ३००/ग्रॅम

GST = ३%

तर दागिन्यांची एकूण किंमत असेल : रु. ३,००० x २० ग्रॅम + (२० gm x रु ३००) = रु. ६६,०००

तुम्हाला जर या एकूण किमतीवर ३% GST लागू केला, तर तुम्हाला रु. ६६,००० + ३% = रु. ६७,९८० रुपये एकूण दर येईल.

अशाप्रकारे या दागिन्यांच्या खरेदीसाठी तुम्हाला ६७,९८० रुपये द्यावे लागतील.

हेही वाचा >> ३८ लाख लग्नं; ४.७४ लाख कोटींचा खर्च, भारतात लग्नसोहळ्यातील प्रचंड खर्चामागची मानसिकता काय?

सोन्याच्या किंमत मोजणीवर कोणते घटक परिणाम करतात?

१. शुद्धता : सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. सोन्यामध्ये २४ कॅरेट हे सर्वात शुद्ध स्वरूप मानले जाते. तर २४ कॅरेट दागिने तयार करण्यासाठी उपयुक्त मानले जात नाही. दागिने करण्यासाठी साधारणपणे १८ कॅरेट आणि २२ कॅरेटचा वापर केला जातो. शुद्धता जितकी जास्त तितके दागिने महाग होतात.

२. मेकिंग चार्जेस : मेकिंग चार्जेस प्रत्येक ज्वेलर्सच्या दुकानात वेगवेगळे असतात. दागिन्यांची डिझाइन कशी आहे यावर ते अवलंबून असतात. साधारणपणे, मेकिंग चार्जेस एकूण सोन्याच्या दराच्या ८% ते ३५% पर्यंत बदलतात. सरकारकडून मेकिंग शुल्काबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. ज्वेलर्स त्यांच्या किमतीनुसार हे ठरवतात. दागिने खरेदी करणाऱ्या खरेदीदारांना मेकिंग चार्जेसमध्ये मोठी सौदेबाजी करण्याची संधी असते, ज्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची अंतिम किंमत आणखी बदलू शकते, असे फोर्ब्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. उदा. छोट्या सराफांच्या दुकानात मेकिंग चार्जेस ४०० ते ५०० पर्यंत असतात, तर ब्रॅण्ड म्हणून नावाजलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात हेच मेकिंग चार्जेस ९०० ते १००० च्या घरात जातात.

३. रत्नांनी जडवलेले दागिने : काही वेळा सोन्याचे दागिने मौल्यवान रत्नांनी जडलेले असतात. तुम्ही ते खरेदी करता तेव्हा वजनानुसार किंमत मोजली तर सोन्याची मुख्य किंमत बदलेल. स्टोन किंवा रत्नाची किंमत एकूण किमतीतून वजा करावी, जेणेकरून तुम्हाला सोन्याची खरी किंमत सहज कळू शकेल.

४. सोन्याची किंमत : सोन्याची मागणी ही पुरवठा व इतर घटकांवर अवलंबून असते, तसेच दैनंदिन किमतीत चढ-उतार होत असतात. राष्ट्रीय सोन्याचे दर दररोज वर्तमानपत्रांमध्ये आणि विविध वेबसाइटवर प्रकाशित केले जातात. परंतु, स्थानिक ज्वेलर्सचे सोन्याचे दरदेखील भिन्न असतात, कारण ते सोने कोणाकडून आणि कोणत्या किमतीला खरेदी करतात, यावर ते पूर्णपणे अवलंबून असते.

देशभरात सोन्याच्या किमती वेगवेगळ्या का आहेत?

दागिन्यांच्या खरेदीसाठी जाताना तुम्हाला दिसेल की, प्रत्येक दुकानात सोन्याच्या दागिन्यांची किंमत वेगळी असते. सोन्याचा दर त्याच्या शुद्धतेनुसार (कॅरेटमध्ये) आणि वजन (ग्रॅममध्ये) सारखे असले तरीही बाजारात प्रत्येक सोन्याच्या वस्तूसाठी कोणतेही एकच एक मूल्य नसते. तिथेच तुमच्या सोन्याच्या किमतीवर आणि गणनेवर परिणाम करणारे वर नमूद केलेले घटक लक्षात ठेवणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे.

वर नमूद केल्याप्रमाणे, सोने व्यापारी आणि किरकोळ विक्रेते दररोज सकाळी गोल्ड संघटनेने ठरवलेल्या दैनंदिन किमतीनुसार काम करतात. प्रत्येक शहरात त्यांची स्थानिक सुवर्ण संघटना असते, जी दररोज सोन्याचे दर घोषित करते. म्हणूनच प्रत्येक शहरात सोन्याच्या समान वजनाच्या वस्तूंच्या किमती वेगवेगळ्या असतात.

जुन्या दागिन्यांची किंमत कशी ठरवली जाते

जुन्या दागिन्यांची किंमत भारतात जुने दागिने वितळवल्यानंतर पुन्हा एकदा एक्सआरएफ मशीनद्वारे शुद्धता तपासली जाते. तीन रीडिंग्ज घेतल्यानंतर सरासरी मूल्य जुन्या सोन्याची खरी शुद्धता मानली जाते, त्यानंतर वितळवलेल्या सोन्याचे पुन्हा एकदा वजन केले जाते. नवीन शुद्धता आणि वजनाच्या आधारे अंतिम किंमत ठरवली जाते.