‘बॉम्बे सायकिअ‍ॅट्रिक सोसायटी’च्या वतीने २०० शाळांमध्ये समुपदेशन कार्यशाळा

नैराश्यासारख्या मानसिक व्याधींना सामोरे जाण्याचे प्रयत्न शालेय पातळीवरच व्हावेत याकरिता ‘बॉम्बे सायकिअ‍ॅट्रिक सोसायटी’ने मुंबईतील २०० शाळांमधील समुपदेशकांच्या कार्यशाळेचे आयोजन करून एका कृती कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी काय उपक्रम घेतले जावेत, नैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधावा, आदी विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांला मानसोपचारतज्ज्ञाची मदत मिळतेच असे नाही; परंतु या कार्यक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्यांना सामोरे जाणे शिक्षकांना व समुपदेशकांना सोपे होईल, असा विश्वास ‘बॉम्बे सायकिअ‍ॅट्रिक सोसायटी’ने व्यक्त केला आहे. सोसायटीने मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक यांच्या मदतीने कृती कार्यक्रमाचा कच्चा मसुदा तयार केला असून मे महिन्यात त्याला अंतिम स्वरूप येईल. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर त्याचे सादरीकरण केले जाणार आहे.

जानेवारी महिन्यात ‘बॉम्बे सायकिअ‍ॅट्रिक सोसायटी’तर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या समजून घेण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात २०० शाळांतील समुपदेशकांनी भाग घेतला. या वेळी विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांना अभ्यासात भेडसावणाऱ्या अडचणी व त्याची कारणे, कुटुंबातील तणावांचा मुलांवर होणारा परिणाम अशा विविध प्रकारची माहिती समुपदेशकांकडून गोळा करण्यात आली. या माहितीतून विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रश्न जाणून घेण्यास मदत झाली. तसेच त्याचा उपयोग समस्यांवर उपाय योजण्याकरिताही सोसायटीला झाला.

शालेय मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. ते कमी व्हावे या दृष्टीने हा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन कसे व्हावे, त्यांच्याशी संवाद कसा साधावा, यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेल्या विद्यार्थ्यांचे टप्प्याटप्प्याने समुपदेशन कसे करावे यावर मार्गदर्शन करण्यात आले आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या पालकांशीही संवाद साधण्याची आवश्यकता असते. मात्र विद्यार्थ्यांने जीव गमावल्यास त्याच्या पालकांशी, मित्रांशी व मित्रांच्या पालकांशीही संवाद साधण्याची आवश्यकता असते. या घटनेमुळे त्याचे मित्रही नैराश्याच्या गर्तेत जाऊ शकतात. अशा मुलांसाठी शाळेने काय करावे याकरिता स्वतंत्रपणे उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. याशिवाय व्यसनाधीन, मारहाण, रॅगिंग आदी हिंसक कृत्ये करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशनाचे विविध मार्ग सुचविण्यात आल्याचे ‘बॉम्बे सायकिअ‍ॅट्रिक सोसायटी’चे माजी अध्यक्ष डॉ. आशीष देशपांडे यांनी सांगितले. हा प्रकल्प ग्रामीण भागातील शाळांकरिताही उपयुक्त ठरू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.