शिक्षकांसाठीची ‘सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट’ (सीटेट) ही पात्रता परीक्षा रविवारी देशभरात सुरळीत पार पडली. ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’तर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या या परीक्षेला देशभरातून तब्बल साडेसात लाख परीक्षार्थी बसले होते. यंदाचे या परीक्षेचे आठवे वर्ष आहे. मंडळाच्या निरीक्षकांव्यतिरिक्त या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी १६०० स्वतंत्र निरीक्षक नेमण्यात आले होते. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रांत ९५९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.
भारतात आणि परदेशातही या परीक्षेची केंद्रे होती. परीक्षेत अडचणी येऊ नये म्हणून उमेदवारांना परीक्षेच्या ९० मिनिटे आधीच परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास सांगितले होते. गैरप्रकार टाळण्याकरिता परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची कसून तपासणी केल्यानंतरच सोडण्यात येत होते. त्यासाठी उमेदवारांना दीड तास आधीच परीक्षा केंद्रांवर येण्यास सांगितले गेले होते, असे सीटेटचे संचालक पी. आय. साबू यांनी सांगितले.