आयोजकांनी दहीहंडीच्या आयोजनातून काढता पाय घेतल्यामुळे पुरस्कर्ते आणि हितचिंतकांनीही आखडता हात घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गोविंदा पथकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आपल्याच विभागात फिरण्याचा निर्णय घेतला तरी दिवसभराचा खर्च कुठून करायचा असा प्रश्न पथकांना पडला आहे. मात्र काही पथकांतील गोविंदांनीच पदरमोड करून गोविंदा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी स्थानिक ठिकाणची मानाची दहीहंडी फोडून मार्गस्थ होणाऱ्या गोविंदांचा दिवसभराचा खर्च प्रचंड असतो. गेल्या काही वर्षांमध्ये पथकांमधील गोविंदांची संख्या वाढतच आहे. बऱ्याच पथकांमध्ये ५०० हून अधिक गोविंदा सहभागी होत असल्याचे निदर्शनास आले आहेत. या सर्वाना टी-शर्ट, हाफपॅन्ट, थरात उभ्या राहणाऱ्यांसाठी पट्टे, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा, रात्रीचे जेवण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरण्यासाठी बसगाडय़ा, डॉक्टरांचे पथक, रुग्णवाहिका आदींसाठी पथकांना प्रचंड खर्च येतो. स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, बडय़ा कंपन्या आदींकडून पथकांना आर्थिक मदतीची रसद पुरविली जाते. त्यातूनच हा दिवसभराचा खर्च केला जातो. मोठी दहीहंडी फोडण्यात यश मिळाले तर लाखभराची कमाई होते. पण थर कोसळले तर या कमाईवर पाणी सोडायला लागते. त्यामुळे दहीहंडीच्या बक्षिसाचा खर्चाचा ताळमेळ बसविताना विचार केला जात नाही. केवळ हितचिंतक आणि पथकांतील गोविंदांनी सढळहस्ते केलेल्या मदतीवर हा खर्च निभावून न्यावा लागतो. आता पुरस्कर्त्यां कंपन्या, काही नेत्यांनी हात आखडता घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गोविंदा पथके एकाकी पडली आहेत. दिवसभराचा खर्च कसा करायचा असा प्रश्न पथकांतील पदाधिकाऱ्यांना  पडला आहे. परंतु पथकांतील गोविंदांनी सढळहस्ते मदत करीत गोविंदा काढायचाच असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे गोविंदांकडून जमा केल्या जाणाऱ्या वर्गणीतून दिवसभराचा खर्च भागविण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. असे असले तरी आर्थिक गणित बिघडलेल्या पथकांना यंदा काटकसरीनेच खर्च करावा लागणार आहे