‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठी बांधण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या चौक्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून या चौक्यांचा वापर सध्या फेरीवाल्यांचे सामान ठेवण्यासाठी केला जात आहे. चौक्यांमधील वीज आणि पाण्याचाही वापर फेरीवाल्यांकडून केला जात असल्याचे सोमवारी ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत उघड झाले. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन ‘बेस्ट’महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी दिले.
भास्कर खुरसंगे यांनी ही बाब सदस्यांच्या निदर्शनास आणून दिली. या चौक्यांचा वापर फेरीवाले जेवण बनविण्यासाठीही करत असल्याचे ते म्हणाले. ‘बेस्ट’कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या चौक्यांचा वापर फेरीवाले करत असून त्यामागे काही अधिकारी आणि फेरीवाले यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचा आरोपही खुरसंगे यांनी केला. चौक्यांची मालकी ‘बेस्ट’कडे असताना त्याच्या चाव्या फेरीवाल्यांकडे असल्याची माहितीही त्यांनी दिली. बसथांबे आणि चौक्यांच्या परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढत असल्याकडेही खुरसुंगे यांनी लक्ष वेधले.