मुंबईत तुम्हाला चायनीज खाण्यासाठी एखाद्या हॉटेलऐवजी रस्त्यावरच्या गाडीवर जायची सवय असेल तर सावधान! कारण मुंबईतील चायनीज गाड्यांवर मिळणारे चिकन हे मेलेल्या आणि रोगट कोंबड्यांचे असते हे अन्न आणि औषध प्रशासन खात्याने मारलेल्या धाडीत निष्पन्न झाले आहे. शिवडी या ठिकाणी एका झोपडीतून ४० ते ५० किलो चिकन जप्त करण्यात आले आहे. हे चिकन चायनीजच्या गाड्यांवर ३० रूपये किलो दराने विकले जात होते अशीही बातमी समोर आली आहे. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे.

मुंबईत दुपारनंतर अनेक ठिकाणी चायनीज गाड्या लागतात. स्वस्त, मस्त आणि चमचमीत खायला मिळते म्हणून चायनीज खाण्यावर आणि विशेषतः नॉनव्हेज चायनीज खाण्यावर तरूणाईचा भर दिसून येतो. मात्र मुंबईत अशा खवय्यांच्या जिवाशी खेळ केला जातो आहे. मुंबईत रोज हजारो कोंबड्या बाहेरून विक्रीसाठी आणल्या जातात. यामधील ज्या कोंबड्या रोगट असतात त्या मरतात. त्याच कोंबड्या शिवडी येथील झोपडपट्टीत विकल्या जात होत्या असेही स्पष्ट झाले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने या झोपडीतून सुमारे ५० किलो चिकन जप्त केले आहे. हे चिकन सडलेले आहे किंवा रोगट कोंबड्यांचे आहे. इतकेच नाही तर अन्न आणि औषध प्रशासनाने चायनीज गाड्यांवर चिकन न खाण्याचे आवाहनही केले आहे.

काही दिवसांपूर्वीच शहापूरमधील खर्डी येथे चायनीज पदार्थ खाल्ल्याने सुमारे ३० जणांना विषबाधा झाली होती. आता मुंबईतील चायनीज गाड्यांवरही कुजलेले किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाचे चिकन मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेव्हा आपण एखादा पदार्थ खायला जातो तेव्हा तो हॉटेलमध्ये महाग आणि गाडीवर स्वस्त का मिळतो याचा थोडा विचार केला तरीही आपल्याला त्याचे उत्तर मिळू शकते. गाडीवर मिळणारे पदार्थ स्वस्त असतात त्यामुळे ते तयार करण्यासाठी ती गाडी चालवणारे लोक निकृष्ट साहित्याचाच वापर करत असणार हे गृहित धरले पाहिजे. आता अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर हीच बाब समोर आली आहे. तेव्हा चायनीज खायला जाणार असाल तर सावधान!