डोंबिवली एमआयडीसी भागात असलेल्या मेट्रोपॉलीटन कंपनीला भीषण आग लागली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. दरम्यान या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. कंपनीत कुणीही नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळली आहे. या कंपनीच्या शेजारच्या कंपन्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीमुळे एमआयडीसी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काही वेळापूर्वीच या कंपनीत स्फोटाचे दोन आवाज आले आणि आगीचा आणखी भडका उडाला आहे.

आग दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लागली. त्यानंतर ही आग नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र ही आग नियंत्रणात आलेली नाही. सुरुवातीला अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आता आणखी सहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. डोंबिवलीतील मॉडेल शाळा सुरक्षेच्या कारणास्तव सोडून देण्यात आली आहे.

डोंबिवलीतील स्टार कॉलनी भागात धुराचे लोट जात आहेत. काळा धूर आणि आगीच्या ज्वाळा या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.