दक्षिण मुंबईमधील कंत्राटाची मुदत संपुष्टात आलेल्या वाहनतळांवर येत्या १५ दिवसांमध्ये कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार असून तोपर्यंत मुंबईकरांना या वाहनतळांवर विनाशुल्क वाहन उभे करता येणार आहे. मात्र कंत्राटदाराच्या नियुक्तीनंतर वाहन उभे करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

दक्षिण मुंबईमधील १० पैकी काही वाहनतळांचे कंत्राट १६ डिसेंबर रोजी, तर काहींचे कंत्राट २१ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे निविदा मागवून पुन्हा या वाहनतळांवर सहा महिन्यांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत या वाहनतळांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क वसूल करण्यात येणार आहे. कंत्राटदाराच्या नियुक्तीनंतर शुल्क वसुलीला सुरुवात होईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.