नाटय़संमेलनाच्या आगामी एक वर्षांच्या कालावधीत मराठी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या परंतु आता विस्मृतीत गेलेल्या रंगकर्मीशी संवाद साधण्याचे नियोजित नाटय़संमेलनाध्यक्ष आणि नाटककार गंगाराम गवाणकर यांनी ठरविले आहे. याची सुरुवात त्यांनी बुधवारी वयाच्या नव्वदीत असलेले ज्येष्ठ नाटय़व्यवस्थापक अरविंद चित्रे यांची त्यांच्या दादर येथील निवासस्थानी भेट घेऊन केली. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाटय़व्यवस्थापक अशोक मुळ्येही उपस्थित होते. या उपक्रमाविषयी मुळ्ये यांनी गवाणकर यांना सांगितले आणि गवाणकर यांनाही ही कल्पना आवडली व त्यांनी त्यास तात्काळ होकार दिला. विद्यमान नाटय़संमेलनाध्यक्षा फैयाज यांनी गेल्या वर्षी नाटय़संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुंबई मराठी साहित्य संघ आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते शि. मो. घैसास यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. अशोक मुळ्ये यांच्याच पुढाकाराने ही भेट झाली होती.
नाटय़संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभराचा हा कालावधी तसा कमीच असतो. या कार्यकाळात मराठी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या आणि आता वयोपरत्वे विस्मृतीत गेलेल्या कलावंतांच्या घरी जाऊन नाटय़संमेलनाध्यक्षांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला तर त्यांनाही आनंद मिळेल, या उद्देशाने आपण ही कल्पना गवाणकर यांच्यापुढे मांडली आणि त्यांनीही तात्काळ होकार दिल्याचे मुळ्ये यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. अरविंद चित्रे ऊर्फ चित्रे काका यांनी १९६३ मध्ये मधुसूदन कालेलकर यांच्या ‘नाटय़वैभव’ संस्थेत ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ या नाटकापासून रंगमंच व्यवस्थापक व प्रॉम्प्टर म्हणून कामास सुरुवात केली. गेली ३४ वर्षे त्यांनी विविध नावाजलेल्या नाटय़संस्थांमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणीवरही आठ वर्षे सदस्य म्हणून काम केले आहे. ‘तुम्ही मला भेटण्यासाठी मुद्दामहून घरी आलात हा माझ्यासाठी आनंदाचा ठेवा आहे. सध्या वृद्धापकाळामुळे कुठे बाहेर जात-येत नाही. पण तुमच्याशी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप छान वाटले. माझी कोणाबद्दलही तक्रार नाही, आयुष्यात मी समाधानी आहे’ अशा भावना चित्रे यांनी गवाणकर यांच्याकडे व्यक्त केल्या. तर गवाणकर यांनी चित्रे यांना चाफ्याची फुले देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. मुळ्ये काकांनी मांडलेली कल्पना आवडली. नाटय़संमेलनाध्यक्षपदाच्या कार्यकाळात मराठी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या अशा ज्येष्ठ रंगकर्मीच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारण्याचे मी ठरविले आहे. त्याची सुरुवात चित्रे काका यांच्यापासून केल्याचे गवाणकर यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.