सफाई कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने परिस्थिती गंभीर

शैलजा तिवले, लोकसत्ता

कूपर रुग्णालयातील करोनाबाधित वॉर्डमध्ये सफाई करण्यासाठी कर्मचारीच उपलब्ध नसल्याने या वॉर्डमध्ये कचऱ्याचे ढीग लागले आहेत. रुग्णालय प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णांना या कचऱ्याच्या ढिगामध्येच वावरावे लागत आहे.

कूपर रुग्णालयात इतर रुग्णांसोबतच आता करोनाबाधित रुग्णांसाठी उपचार सुरू केले आहेत. रुग्णालयात चतुर्थश्रेणी कामगार आणि परिचारिकांचा तुडवडा असूनही त्यात हा विलगीकरण कक्ष सुरू केल्याने डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

विलगीकरण कक्षामध्ये काम करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर सफाई कामगारांची नियुक्ती केली होती. मात्र प्रत्यक्षात हा वॉर्ड सुरू झाल्यापासून कर्मचाऱ्यांनी येणेच बंद केले आहे. सध्या या वॉर्डमध्ये काम करण्यासाठी केवळ तीनच कर्मचारी उपलब्ध आहेत.

विलगीकरण कक्षामध्ये सध्या ८५ कर्मचारी असून यांच्यामागे केवळ एकच सफाई कमर्चारी उपलब्ध आहे. त्यांना यासह बाहेरील साफसफाई इतर कामे असल्याने ते वॉर्डमध्ये दररोज सफाईसाठी येत नाहीत. त्यामुळे कागदे, पाण्याच्या बाटल्या तशाच पडून असतात. वापरलेले हातमोजे, एन ९५ मास्कसह इतर कचराही डबा भरून गेला तरी तेथेच पडलेला असतो. वार्डमधील शौचालयही स्वच्छ न केल्याने दुर्गंधी पसरलेली असते. कर्मचाऱ्याला बाहेरीलही सफाई करायची असते. त्यामुळे तोही थकून जातो, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

अशा परिस्थितीमध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास मी एकटाच मृतदेह कसा बांधणार असा त्या कर्मचाऱ्याचा प्रश्न असल्याने मग मृतदेहही बराच काळ तसेच ठेवले जातात. रात्रीच्या वेळेस तर सफाई कर्मचारीही नसतो. या सर्व अडचणींचा विचार मात्र रुग्णालय प्रशासन करत नाही.

परिचारिकांचे हाल

विलगीकरण कक्षामध्ये काम करण्यासाठी दहा पारिचारिकांचे गट केले आहेत. या परिचारिंकाना राहण्यासाठी जोगेश्वरी येथील हॉटेलमध्ये सोय केली आहे. परंतु येथे राहण्याव्यतिरिक्त जेवण्याची-पिण्याच्या पाण्याची नीट सोयही उपलब्ध नाही.  परिचारिकांना कामावर हजर होण्यापूर्वी जेवण उपलब्ध होत नाही, मग नाइलाजाने त्यांना उपाशीच वॉर्डमध्ये जावे लागते. यावर उपाय म्हणून त्यांना रुग्णालयातील उपचारगृहात जेवण्याचे वरिष्ठ परिचारिकांनी सांगितले आहे. बाधितांच्या सातत्याने संपर्कात असलेल्या परिचारिका उपहारगृहात गेल्यास इतरांनाही संसर्ग होण्याच संभव आहे.