मुलुंड पश्चिम येथील जुनी ५३ वर्षांची रणजीत सोसायटीची वस्ती. शनिवारच्या संततधार पावसात या इमारतीच्या तळमजल्यावर पाणी शिरले. या वेळी रहिवाशांनी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दूरध्वनी केला. ..आणि या कर्मचाऱ्यांचा ‘सैराट’ अनुभव त्यांना आला. तब्बल अडीच तासांनी उगवलेले हे आपत्ती व्यवस्थापन पथक ‘झिंगझिंग िझगाट’ होते.. त्यांनी दिलेल्या सल्ल्यांनी मध्यरात्री या रहिवाशांना ‘वेड’ लागण्याची वेळ आली होती.

मुलुंड पश्चिमेकडील  तीन इमारतींच्या सोसायटीत एकूण ७२ सदनिका असून तीनशेच्या आसपास येथील रहिवाशांची वस्ती आहे. ५३ वर्षांत या इमारतीत कधी पाणी शिरल्याचे माहीत नाही. सोसायटी जुनी असून रस्त्याचा भाग उंच झाला आहे.

सोसायटीतील कुटुंब रात्री दहाच्या सुमारास झोपण्याच्या तयारीत होती. पण धो-धो पडणाऱ्या पावसाने मात्र येथील तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांची चिंता वाढवत नेली. काही तासांत येथील इमारतींच्या तळमजल्यावर पाणी शिरले. पावसाच्या पाण्यासोबत अनेक प्रकारचे कीटक घरात शिरले.  या काळात रहिवाशांनी हक्काच्या आधार असलेल्या पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे रात्री साडेदहाच्या सुमारास धावा केला. पण ते काही वेळेवर आले नाहीत. तब्बल अडीच तासांनी म्हणजे एक वाजता आपत्ती व्यवस्थापनाचे पथक आले. पण ते चक्क झगाट होऊनच.. आपत्ती व्यवस्थापनाचे हे तर्र्र कर्मचारी रहिवाशांना आपत्ती ठरले. त्यांनी तोडलेल्या अकलेच्या ताऱ्यांनी रहिवाशांच्या डोळ्यासमोर मध्यरात्री तारे चमकले.

या सोसायटीत राहणारे अडव्होकेट संदीप भिमेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रथम आपत्ती व्यवस्थापनाला दूरध्वनी करून सोसायटीत पाणी शिरले असून त्याकरिता पंपाने पाणी बाहेर फेकणे गरजेचे असल्याचे सांगितले. मात्र इमारतीत वेगाने एवढे पाणी कुठून शिरत होते हे काहीच कळत नसल्याचे भिमेकर यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळविल्यानंतर बराच काळ निघून गेला म्हणून त्यांनी दोन वेळा महापौर स्नेहल आंबेकर यांना दूरध्वनी केला. त्यांनीही आपण तातडीने मदत पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर सुमारे अडीच तासांनी म्हणजे रात्री एक वाजता आपत्ती व्यवस्थापनाची टीम रणजीत सोसायटीत आली. दहा जणांपकी यातील नऊ जण तर्राट असल्याचे भिमेकर यांनी नमूद करून त्यांनी दिलेल्या सल्ले आणि सूचनांनी कपाळावर हात मारण्याची वेळ रहिवाशांवर आली.

अकलेचे तारे

‘सोसायटीत पाणी भरले, पंप लावून नाल्यात सोडा,’ या मागणीवर   पथकातील एका कर्मचाऱ्याने ‘इमारतीची भत तोडून टाका, पाऊस थांबला की पाणी आले तसे निघून जाईल,’ असे सांगितले.   तर्र झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या उत्तरांनी मध्यरात्री हैराण झालेल्या रहिवाशांना ‘येड’ लागण्याची वेळ आली होती. दरम्यान, याप्रकरणी     पालिका प्रशासनाकडे  तक्रार  दाखल करण्यात आली आहे.