‘ओएनजीसी’च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची घोषणा; पाच मृतदेहांची ओळख पटली

हेलिकॉप्टर अपघाताचे कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू केल्याची माहिती ओएनजीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक शशी शंकर यांनी रविवारी दिली. नौदल, तटरक्षक दलाकडून अरबी समुद्रात सुरू असलेल्या शोधमोहिमेची माहिती घेण्यासाठी शंकर मुंबईत होते. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहा मृतदेह हस्तगत करण्यात यंत्रणांना यश आले. त्यापैकी पाचजणांची ओळख नातेवाईकांनी पटवली. पवनहंस हेलिकॉप्टरचे कॅप्टन व्ही. कटोच यांचा शोध सुरू असून यंत्रणांची शोधमोहिम सुरू आहे.

ओएनजीसीच्या पाच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना घेऊन तेलवहिरींकडे जाणारे पवनहंसच्या हेलिकॉप्टरला शनिवारी अपघात घडला. त्यानंतर नौदल, तटरक्षक दल, ओएनजीसीकडून समुद्रात शोधमोहिम, बचावकार्य सुरू करण्यात आले. शनिवारी रात्रीपर्यंत छिन्नविछिन्न अवस्थेतील सहा मृतदेह यंत्रणांच्या हाती लागले. यापैकी पी.एन. श्रीनिवासन, जोस अ‍ॅन्थोनी, पंकज गर्ग, सर्वनन रामचंद्रनआणि रमेश ओहटकर यांच्या मृतदेहाची ओळख नातेवाईकांनी पटवली. मूळचे पुण्याच्या मगरपटटा येथील रहिवासी असलेले ओहटकर पवनहंसचे कॅप्टन होते. तर श्रीनिवासन, गर्ग, अ‍ॅन्थोनी, सर्वनन हे ओएनजीसीचे उच्चपदस्थ अधिकारी. या पाच मृतदेहांसह मानवी अवशेषही यंत्रणांनी हस्तगत केले आहेत. तांत्रिकदृष्ट्या ओएनजीसीचे अधिकारी व्ही. के. बिंदू लाल बाबू आणि पवनहंसचे कॅप्टन व्ही. कटोच यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. त्यांचा शोध सुरू आहे.

येलोगेट पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतली असून पुढील कारवाई सुरू केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरचा अपघात का, कसा घडला याची चौकशी संबंधीत यंत्रणेतील तज्ज्ञांकडून होईल. त्या चौकशीत निष्काळजीपणा आढळला, जबाबदारी निश्चित करण्यात आली आणि त्याबाबतची तक्रार दिली गेली तर गुन्हा नोंदवून पुढील कारवाई केली जाईल.