News Flash

नवउद्य‘मी’ : ६० शब्दांचा खेळ

नीरज पंडित

६० सेकंदांचं एक मिनिट.. ६० मिनिटांचा एक तास आणि आता ६० शब्दांची एक बातमी.. ६० या आकडय़ासोबत नवी ओळख जोडणाऱ्या बातमीमागची बातमी खरोखरच खूप आगळी आहे. ‘थोडक्यात गोडी’ या तत्त्वावर चालणाऱ्या तरुणाईला वाचनासाठीही फारसा वेळ मिळत नाही. यामुळेच जगभरातील वृत्तपत्रांच्या बातम्यांची शब्दमर्यादा कमी होत गेली. यातूनच न्यूज फ्लॅश, ब्रेकिंग न्यूज यांसारख्या संकल्पनांचा जन्म झाला. दोन वाक्यांत बातमी पोहोचवणे हा मुख्य उद्देश बनला. तरुणाईची ही लघू आवड लक्षात घेता ट्विटरसारख्या समाजमाध्यमानेही १४० अक्षरांमध्ये भावना व्यक्त करण्याचे माध्यम खुले करून दिले. अशा वेगवान तंत्रस्नेही तरुणाईला बातम्यांचा वेध अल्प शब्दांत घेता यावा यासाठी तीन आयआयटीयन्सनी मिळून ‘इनशॉर्ट’ नावाचे अ‍ॅप सुरू केले आणि या माध्यमातून सर्वाना बातम्या पोहोचवण्यास सुरुवात केली.

इनशॉर्टचा संस्थापक अझर इक्बाल आणि अनुन्यय अर्णव दोघेही आयआयटी दिल्लीत पदवी शिक्षण घेत होते. या वेळेस त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांचे मित्र कुणीही वर्तमानपत्र वाचत नाहीत. पण त्यांना बातम्या जाणून घ्यायला आवडतात. यातील काही जण वर्तमानपत्र वाचतात. पण लेखांच्या किंवा बातम्यांच्या पहिल्या दोन ओळी वाचतात आणि पुढचे वाचन करत नाहीत. मग जगभरातील वृत्तपत्रांच्या वृत्तांचा आढावा घेऊन त्याचा गोषवारा जर उपलब्ध करून दिला तर कसे होईल, अशी संकल्पना या दोघांनी मांडली. यानंतर ताबडतोब म्हणजे १ एप्रिल, २०१३ रोजी त्यांनी एक फेसबुक पान सुरू केले. या पानावर ते देशातील तसेच आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांचा संदर्भ देऊन थोडक्यात वृत्त प्रसिद्ध करू लागले. अवघ्या दहा दिवसांमध्ये त्यांच्या या पानाला पाच हजारहून अधिक लाइक्स मिळाले. मग त्यांनी ही संकल्पना मोठय़ा स्वरूपात सर्वासमोर नेण्याचे ठरविले. यातून ‘इनशॉर्ट’ या मोबाइल अ‍ॅपचा जन्म झाला. दरम्यान खरगपूरच्या आयआयटी येथील दीपित पूरकायस्थ ही तरुणीही त्यांच्यात सहभागी झाली आणि संकल्पनेवर अधिक काम सुरू झाले. सप्टेंबर, २०१३मध्ये अ‍ॅप सुरू झाले. अल्पावधीतच या अ‍ॅपला सर्वाकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि हे अ‍ॅप गुगलच्या अँड्रॉइड अ‍ॅपबाजारातील सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅपच्या यादीत समाविष्ट झाले. या अ‍ॅपला लोकांनी पाच पैकी ४.६ इतके गुण दिल्याने आमची संकल्पना लोकांना पसंत पडल्याचे आम्हाला जाणवल्याचे अझर सांगतो.

या अ‍ॅपसाठी मजकूर मिळवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. यासाठी कंपनीने देशातील तसेच परदेशातील अनेक मोठय़ा वृत्तपत्र समूहांशी सहकार्य करार केले आहेत. यानुसार या वृत्तपत्र समूहांच्या संकेतस्थळावरील वृत्ताची छोटी आवृत्ती या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. यानंतर अधिक तपशील वाचण्यासाठी वाचकांना संबंधित वृत्तपत्र समूहाच्या संकेतस्थळावर जाता येणार आहे. सुरुवातीला केवळ इंग्रजीमध्ये असलेली ही सेवा आता हिंदीतही सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर वृत्ताचे लघुरूप करण्यासाठी कंपनीत काही माणसांची नेमणूक करण्यात आली आहे.

सध्या ही कंपनी केवळ गुंतवणूकदारांनी दिलेल्या निधीवर उभी आहे. या कंपनीत माजी आयआयटीयन्स आणि फ्लिपकार्टच्या संस्थापकांनी गुंतवूक केली असून त्यांनी या तरुणांना प्रोत्साहन दिले आहे. आता लवकरच कंपनी निधी उभारणीसाठी काही गुंतवणूकदारांसमोर आपल्या उत्पादनाचे सादरीकरण करणार असल्याचे अझर सांगतो. याचबरोबर आत्ताच्या घडीला कंपनीसाठी उत्पन्नस्रोत हा तितका महत्त्वाचा मुद्दा नसून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे अझर सांगतो.

भविष्यातील नियोजन

भविष्यात ही भारतीय कंपनी परदेशात पोहोचवण्याचे आमचे प्रयत्न आहे. याचे कारण म्हणजे अशा प्रकारची कोणतीच सेवा परदेशातही उपलब्ध नाही आहे. देशातील विकासाबरोबरच परदेशातील विकास हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे अझर सांगतो. यामुळे लवकरच कंपनीला जागतिक स्तरावर पाहण्यासाठी आम्ही तयारी करत असल्याचे अझरने नमूद केले.

नवउद्यमींना सल्ला

ज्या तरुणांना व्यवसाय करायचा आहे त्या तरुणांनी सुरक्षितता येण्याची वाट पाहू नये. तुम्ही जेव्हा एखाद्या समस्येवर उत्तर देण्यासाठी उत्सुक असता तीच तुमचा व्यवसाय सुरू करण्याची योग्य वेळ म्हणता येईल. व्यवसायाचा मार्ग हा नेहमीच आव्हानांचा आणि मेहनतीचा असतो. यामुळे तुम्ही त्याचे नियोजन कसे करता आणि त्या नियोजनानुसार कसे पुढे जाता हे महत्त्वाचे असते. यात सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे आपण विश्वासाने काम करणे आणि हा प्रवास अनुभणे.

@nirajcpandit

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 3:57 am

Web Title: iitians made inshort app
Next Stories
1 गॅलऱ्यांचा फेरा : पावसाळी प्रदर्शनांचीही आबादानी!
2 सहज सफर : बेधुंद बेकरे!
3 रिक्षा-टॅक्सीचालकांना आता विनम्रतेचे धडे!
Just Now!
X