ताण हलका करण्यासाठी ‘मार्ड’चा अनोखा उपक्रम

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई :  करोना काळात निवासी डॉक्टरांना अडचणींसह निवास व्यवस्थेतील सुविधांपर्यंत अनेक पातळ्यांवर गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तणावाखाली असलेल्या या डॉक्टरांचे

मनोबलही वाढविले जात आहे. चांगल्या सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या अडचणीही तत्काळ सोडविल्या जात आहेत. यासाठी केईएमच्या मार्ड संघटनेने नियोजन केले आहे.

करोना काळात गेल्या तीन महिन्यांत अनेक निवासी डॉक्टरांना फक्त तीन ते चार वेळा सुट्टय़ा मिळाल्या आहेत. सलग सेवा देत असलेले हे डॉक्टर आता थकले आहेत. सेवा देताना जेवणाची, वैयक्तिक सुरक्षा साधनांची अनुपलब्धता, लक्षणे जाणवल्यास अलगीकरणाच्या सुविधेतील गैरसोयी अशा समस्या सोडविण्यात निवासी डॉक्टरांची बरीच दमछाक होत आहे. त्यामुळे ते सतत तणावात असतात. हा ताण कमी करण्यासाठी केईएमच्या मार्ड प्रतिनिधींनी निवासी डॉक्टरांच्याच नऊ वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या आहेत. जेवण, वैयक्तिक सुरक्षा साधने, वसतिगृहाशी निगडित समस्या, अलगीकरण सुविधा, बाधित डॉक्टरांना विलगीकरण कक्षामध्ये खाटांची सुविधा आणि वेळेत उपचार, मानसिक पाठबळ, प्रशिक्षण, वैद्यकीय विभागीय समस्या, कामाचे नियोजन आणि विविध आरोग्य विभागांकडून येणारी माहिती उपलब्ध करणे असे विविध नऊ विषयांवर या समित्या कार्यरत आहेत.

रुग्णसेवा देताना अचानक रुग्ण दगावल्यास किंवा एकामागोमाग एक मृत्यू पाहिल्यानंतर डॉक्टरही अस्वस्थ होत असतात. त्यांना मानसिक आधाराची आवश्यकता असते. असे कु णाबाबत घडत असल्याचे लक्षात आल्यास त्यांना सुट्टी देऊन आरामासाठी पाठविणे, त्यांच्याशी संवाद साधून मानसिक ताण हलका करण्यास मदत करणे, यावर लक्ष दिले जाते, असे केईएमचे मार्ड प्रतिनिधी डॉ.कौस्तव दासगुप्ता यांनी सांगितले.

डॉक्टरांना आता कोणतीही अडचण आल्यास ते थेट संबंधित समितीच्या प्रमुखाशी बोलतात. यांचे वेगवेगळे व्हॉट्सअ‍ॅप गटही तयार केलेले आहेत. त्यामुळे या अडचणी जलदगतीने सोडविल्या जातात. चतुर्थश्रेणी कामगारांना करोना वॉर्डमध्ये काम करण्याचे प्रशिक्षणही समितीकडून दिले जाते. या आजाराबाबत त्यांची भीती कमी करण्यातही याची मदत होत असल्याचे मार्डने व्यक्त केले.

इतर महाविद्यालयांमध्येही सुरुवात

महाविद्यालय स्तरावर हे प्रारूप आम्ही सुरू केले असून डॉक्टरांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर महाविद्यालयांनी याचप्रमाणे काम करण्यास सुरुवात केल्याचे मार्ड प्रतिनिधी मोठय़ा आनंदाने सांगतात.