भांडूप येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील फिर्यादीने इमारतीमधील सुरक्षा एजन्सीचा गैरकारभार माहिती अधिकाराअंतर्गत उघड केल्याने हा हल्ला झाला होता. विशेष म्हणजे, भांडूप पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या दोघांची जामिनावर मुक्तता झाली होती.
२५ ऑगस्ट २०११ रोजी भांडूप येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर जनता मार्केटमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी दिलीप वैष्णव उर्फ कव्वा तसेच विलास कदम यांना अटक केली होती. मात्र त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याने जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ७ कडे आल्यानंतर त्यांनी अवघ्या १६ दिवसांत तपास करून संजय लाड(३२), गुरुदीप विरधी (३६)आणि अनिल मोर्वेकर (२७) यांना अटक केली. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी सांगितले की फिर्यादी आणि मुख्य आरोपी विलास कदम एकाच इमारतीत राहतात. फिर्यादीने माहिती अधिकाराअंतर्गत विलास कदम याची इमारतीत बेकायदा चालणाऱ्या सुरक्षा एजन्सीचा गैरकारभार उघड केला होता. त्यामुळे विलास कदम याने हा हल्ला घडवून आणला होता. यापूर्वी अटक केलेला आरोपी दिलीप वैष्णव याचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे पोलिसांनी सांगितले. विलास कदमवर भांडूप ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद असून त्याला यापूर्वी तडीपार केले होते.