अंकुश सुरवडे (वय २६) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्या प्रकरणात शीव रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा झाल्याची स्पष्ट कबुली देत सखोल चौकशीसाठी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीविषयी माहिती देताना दरेकर म्हणाले, शीव रुग्णालयामध्ये मृतदेह,  रुग्ण प्रवेशासंदर्भातील नोंदी, वैद्यकीय सामग्री उपलब्ध नसणे, एमआरआय यंत्रणा नादुरुस्त असणे, असे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वारंवार घडत आहेत. मुंबईमधील सामान्य रुग्णांसाठी हे एक प्रमुख रुग्णालय आहे. अंकुश सुरवडे प्रकरणात केवळ कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी होती. त्यामुळे चौकशी समिती नेमण्यात येणार असून त्यामध्ये आरोग्य खात्यातील तज्ज्ञ व पोलीस खात्यातील अधिकारी यांचा समावेश असेल; पण या समितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक असावेत, अशी विनंतीही आम्ही आयुक्तांकडे केली आहे.