रसिका मुळ्ये

प्रत्येक विद्यापीठाकडून वर्षांला शेकडोनी वाटल्या जाणाऱ्या पीएचडीसाठी प्रवेश घेणे आता काहीसे आव्हानात्मक होणार आहे. प्रवेशासाठीच्या लेखी परीक्षेबरोबरच उमेदवारांना मुलाखतीसाठीही कसून तयार करावी लागणार असून आता मुलाखतीचे ३० टक्के गुण प्रवेशासाठी ग्रा धरण्यात येणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठांकडून शेकडो विद्यार्थ्यांना दरवर्षी पीएचडी दिली जाते. त्यात प्रवेशापासून ते पीएचडी मिळेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता राखली जात नसल्याची चर्चाही सार्वत्रिक आहे. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने किमान अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या टप्प्यावरील आव्हान काहीसे वाढवले आहे. यापुढे पीएचडी प्रवेशासाठी ७० गुणांची लेखी परीक्षा असेल त्याचबरोबरच मुलाखतीसाठी ३० टक्के गुण राखले जाणार आहेत. त्यामुळे पीएचडी इच्छुकांना मुलाखतीतही कसाला उतरावे लागणार आहे. विभागीय संशोधन समितीपुढे उमेदवारांना त्यांचा संशोधनाचा विषय, त्याची आवश्यकता याबाबत सादरीकरण करावे लागेल.

गेल्या वर्षी एमफिल, पीएचडीच्या नियमनासाठी नवा कायदा लागू करण्यात आला. त्यामध्ये प्रवेश परीक्षा, मुलाखत अशा टप्प्यांच्या माध्यमातूनच पीएचडी प्रवेशाची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार मुलाखत घेणे बंधनकारक होते, मात्र त्यासाठी गुण निश्चित करण्यात आले नव्हते. त्यामुळे पीएचडी प्रवेशाच्या मुलाखती उमेदवार आणि संशोधन सिमतीकडूनही गांभिर्याने घेण्यात येत नसल्याची टीका होत होती. त्याचप्रमाणे संशोधनाच्या विषयाचा आवाका, गांभीर्य अशा बाबी स्पष्ट होण्यासाठी मुलाखतच गरजेची आहे. केवळ लेखी परीक्षेतून उमेदवाराची क्षमता लक्षात येत नाही, असे पीएचडी मार्गदर्शकांचे मत होते. मात्र मुलाखत किंवा सादरीकरणाचे मूल्यमापन कसे करावे, त्याचे गुण कसे असावेत याबाबत काही नियम नसल्यामुळे मुलाखतीच्या टप्प्यातून निवड होताना अन्याय होत असल्याची भावना उमेदवारांमध्ये होती. आता मात्र मुलाखतीसाठीही गुण ग्रा धरण्यात येत असल्यामुळे लेखी परीक्षेची तयारी करतानाच संशोधनामागील उद्दिष्ट मांडणारा आराखडाही उमेदवारांकडे तयार असणे गरजेचे असणार आहे.

गुण कसे असतील?

लेखी परीक्षेतील ५० टक्के प्रश्न हे संशोधन पद्धतीवर आणि ५० टक्के प्रश्न हे ज्या विषयात संशोधन करायचे आहे त्या विषयातील असतील. या परीक्षेत मिळालेल्या गुणांचा भारांश ७० टक्के असेल. त्यानंतर उमेदवाराचा संशोधनाचा विषय, विद्याशाखा याबाबत तज्ज्ञांकडून घेण्यात आलेली मुलाखत आणि उमेदवाराने केलेले सादरीकरण यांना ३० टक्के भारांश देण्यात येईल.