अभिनेत्री जिया खान हिने भावनेच्या आवेगात केलेल्या कृत्यासाठी एकटय़ा सूरज पांचोलीला जबाबदार धरता येणार नाही, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सूरजची अखेर ५० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. विशेष म्हणजे जियाच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या ज्या पत्राच्या आधारे सूरजला जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, ते पत्र कुणाला उद्देशून किंवा कधी लिहिले ते स्पष्ट होत नाही. त्यामुळे त्या पत्राला तिचे आत्महत्येपूर्वीचे पत्र मानता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर सूरजने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित करीत सूरजला सशर्त जामीन मंजूर केला. २२ वर्षांच्या सूरजने आधीच २१ दिवस तुरुंगात घालविले असून त्याला आणखीन कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.  
एका तरुण मुलीने अशाप्रकारे आयुष्याचा अंत करावा ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु ती कमालीची भावनेच्या आहारी गेली होती आणि त्या आवेगात तिने केलेल्या कृत्यासाठी एकटय़ा सूरजला जबाबदार धरता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
पुढे आलेल्या पुराव्यांतून ज्या पत्राच्या आधारे सूरजला अटक करण्यात आली ते पत्र सूरजला मिळालेच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच त्याने हेतूत: तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलेले नाही, असे न्यायालयाने नमूद केले. जियाने स्वेच्छेने त्याच्यासोबत संबंध ठेवले होते. मुख्य म्हणजे याआधीही तिने बऱ्याचदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच सूरज तिची अधिक काळजी घेत होता हे दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. जियाची आई या घटनांबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होती, ही बाबही न्यायालयाने नमूद केली. जिया सूरजप्रती अतिसंवेदनशील होती. याउलट सूरजने करिअरवर अधिक लक्ष केंद्रित केले होते आणि त्यामुळे तो तिला वेळ देऊ शकत नव्हता. त्यातच घटनेच्या दिवशी दोघांमध्ये झालेल्या गैरसमजामुळे जिया अधिक संतापली होती, असेही न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना नमूद केले. जियाच्या गर्भपाताची आणि त्यामुळे ती प्रचंड तणावाखाली असल्याची माहिती तिच्या बहिणीला होती, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

पोलिसांना प्रश्न
जियाच्या आत्महत्येनंतर तिच्या घरातून सापडलेले पत्र सूरजच्या नावे वा त्यालाच उद्देशून लिहिले असल्याचे म्हणता येईल का, या पत्राला तिचे आत्महत्येपूर्वीचे पत्र म्हणणे योग्य आहे का, या पत्रावर तारीख नसल्याने ते तिच्या आत्महत्येशी जोडता येऊ शकेल का, एक मोबाईल वगळता सूरजविरुद्ध ठोस पुरावा काय आहे, एकदा नव्हे, तर दोनदा जबाब नोंदवला असून त्याच्या आणखी कोठडीची गरज काय, असे  प्रश्न न्यायालयाने विचारले.