उरण येथील खोपट गावालगत असणाऱ्या एका गोदामावर छापा टाकून नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी चार हजार ४०० किलो वजनाचे रक्तचंदनाचे २७४ नग  जप्त केले. त्याची किमंत अंदाजे ६६ लाख रुपयांपर्यंत आहे असे पोलिस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उरण येथील जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातील रक्तचंदनाची तस्करी केली जाते. अशा रक्त चंदनाचा साठा खोपटगावा-नजीकच्या एका गोदामात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्याने सहाय्यक आयुक्त सुरेश पवार व निरीक्षक राजेंद्र कदम यांनी वनविभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थित छापा टाकला.
या प्रकरणात नरेशकुमार खरसान व रामकिशन पांडे या दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून दिल्ली येथील सिंग नावाच्या व्यक्तीने हे रक्तचंदन जमा करुन ठेवले होते अशी माहिती तपासात उघड झाली आहे.