भारतीय टपाल खात्याने टपाल सहाय्यक आणि छटाई सहाय्यकच्या १२०८ पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा एकदा लावलेला निकाल संगणकीय बिघाडामुळे मागे घेतला व पुन्हा सुधारीत निकाल जाहीर केला. सधारीत निकालातून पहिल्या निकालातील शकडो उमेदवारांची नावेच गायब झाल्यामुळे या उमेदवारांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या गोंधळाचा छडा लागेपर्यंत ही भरती प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात राज्याच्या मुख्य पोस्ट मास्टर जनरलने दिल्लीला पत्र पाठविल्याचेही समजते.
टपाल खात्यातील टपाल सहाय्यक आणि छटाई सहाय्यकच्या पदांच्या भरतीसाठी २१ मे रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तसेच ९ व १४ सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये संगणकीय पात्रता परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. इतकेच नव्हे तर निकालासोबत उमेदवारांना कोणत्या टपाल कार्यालयातून कोणत्या पदासाठी नियुक्त पत्र मिळेल याची यादीही जाहीर करण्यात आली होती. मात्र निकालात संगणकीय चुका असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोन दिवसांनी हा निकाल परत मागे घेण्यात आला व लवकरच सुधारीत निकाल जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले. यानुसार १६ फेब्रुवारी रोजी सुधारीत निकाल जाहीर करण्यात आला. पण या निकालात जुन्या यादीतील २८० हून अधिक उमेदवारांची नावे गायब झाली. यामुळे एकच खळबळ उडाली. जून्या यादीत एका उमेदवाराला लेखी परीक्षेत ७० आणि संगणकीय पात्रता परीक्षेत ७४.५७ गुण मिळाले होते. पण सुधारीत यादीत यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराचे नाव आले पण या उमेदवाराचे नाव गायब झाले. अशी शेकडो उदाहरणे समोर आल्यानंतर उमेदवारांनी संबंधित ठिकाणच्या टपाल कार्यालयात धाव घेली.
मात्र त्यांना मुख्य टपाल खात्यात संपर्क साधण्यास सांगण्यात आले. यानुसार राज्यातील अनेक उमेदवार मुंबईत दाखल झाले. मात्र त्यांना सर्मपक उत्तरे मिळत नसल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. काही उमेदवारांनी या संदर्भातील तपशील माहितीच्या अधिकाराखालीही मागविला आहे. या संदर्भात टपाल खात्याकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळत नसल्यामुळे गोंधळ आणखीच वाढतो आहे.