मुंबईत आग लागण्याचे सत्र सुरुच असून लोअर परळमधील नवरंग स्टुडिओत शुक्रवारी पहाटे आग लागली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून या घटनेत अग्निशमन दलातील १ कर्मचारी जखमी झाला आहे.

लोअर परळमध्ये नवरंग स्टुडिओ असून हा स्टु़डिओ गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. शुक्रवारी पहाटे स्टुडिओत भीषण आग लागली. आग लागली त्यावेळी स्टुडिओत कोणीही नव्हते. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आग विझवताना अग्निशमन दलातील एक जवान जखमी झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मुंबईतील अग्नितांडवाचे सत्र सुरुच आहे. यापूर्वी कांजुरमार्गावरील सिनेव्हिस्टा स्टुडिओत लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. ४ जानेवारी रोजी अंधेरीत वातानुकूलन यंत्रामध्ये लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. मैमून मंजिल येथे ही घटना घडली होती. त्यापूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह व मोजो ब्रिस्टो या पबमध्ये आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ डिसेंबर रोजी साकीनाका भानू फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीत १४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.