मुंबईतही थंडीचे बस्तान बसत असून मंगळवारी सकाळी तापमान आणखी घसरले. सांताक्रूझ येथे १७.९ अंश सेल्सिअस तापमानाची तर कुलाब्यात २० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

यंदा डिसेंबर उजाडला तरीही घामाच्या धारा सुरू होत्या. या आठवडय़ापासून मात्र तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. शनिवारी सांताक्रूझ येथे १८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर तापमानात आणखी घट झाली असून मंगळवारी तापमान १८ अंश सेल्सिअस खाली गेले. हे या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे. गेल्या दहा वर्षांतील डिसेंबरमधील तापमानाचा अंदाज घेतला असता अखेरच्या आठवडय़ात तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याचे दिसून येत आहे.