दक्षिण मुंबईला थेट पूर्व उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या साडेसोळा किलोमीटर लांबीच्या पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पातील साडेतेरा किलोमीटरचा टप्पा अखेर गुरुवारी मुंबईकरांसाठी खुला होत आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्प तयार असताना केवळ उद्घाटनाच्या राजकारणापायी तो वाहतुकीसाठी खुला होत नसल्याची टीका झाल्यानंतर लागलीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्घाटनासाठी गुरुवारी दुपारी ३ वाजताची वेळ दिली आहे.
फायदा काय?
मुंबईतील रस्ते वाहतुकीतील एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पूर्व मुक्त मार्ग प्रकल्प हाती घेतला.  छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाजवळील ऑरेंज गेट ते आणिक हा ९.२९ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा, आणिक ते पांजरापोळ हा ४.३ किलोमीटर लांबीचा दुसरा टप्पा आणि पांजरापोळ ते घाटकोपर हा २.८१ किलोमीटर लांबीचा तिसरा टप्पा अशा रीतीने हा प्रकल्प होत आहे. त्यामुळे मुंबईतून आणिकपर्यंत उन्नत मार्गाने (इलेव्हेटेड रोड) व नंतर आणिक ते पांजरापोळदरम्यान भाभा अणुसंशोधन केंद्राच्या डोंगरात बांधण्यात आलेल्या ५०० मीटर लांबीच्या भुयारी रस्त्याने प्रवास करता येईल. पहिल्या टप्प्यात ऑरेंज गेट ते पांजरापोळपर्यंतचा साडेतेरा किलोमीटरचा पट्टा मुंबईकरांसाठी गुरुवारी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे २० ते २५ मिनिटांत छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ते चेंबूपर्यंतचा प्रवास वाहनधारकांना करता येईल. त्यामुळे दक्षिण मुंबईहून पूर्व उपनगरे आणि नवी मुंबई, ठाण्याकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रखडपट्टी कारण?  पूर्व मुक्त मार्ग प्रकल्प हा मे महिन्याच्या अखेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे वर्षांरंभी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहीर केले होते. नंतर खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याचा पुनरुच्चार केला होता. मे महिन्याच्या शेवटच्या दिवसांत मिलन सबवे येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांनी केले. पण मुंबईतील वाहतुकीसाठी मोठा दिलासा असणाऱ्या पूर्व मुक्त मार्गाचे उद्घाटन मात्र रखडले आहे. ‘एमएमआरडीए’ने प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी कधीच केली. पण मुख्यमंत्र्यांकडून अद्याप वेळ मिळत नव्हता. रविवार आणि सोमवारच्या पावसात मुंबईतील वाहतुकीचा बोऱ्या वाजल्याने उद्घाटनाअभावी पडलेल्या या प्रकल्पाचा विषय ऐरणीवर आला. माध्यमांमधून टीकेची झोड उठली. यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘एमएमआरडीए’ला पूर्व मुक्त मार्गाच्या उद्घाटनासाठी गुरुवारी दुपारी ३ वाजताची वेळ दिली. त्यामुळे अखेर हा प्रकल्प खुला होत आहे.