परस्परांच्या विरोधात निवडणुका लढविताना पार एकमेकांचे वाभाडे काढायचे, पातळी सोडून आरोप-प्रत्यारोप करायचे आणि जातीयवादी पक्षांना दूर ठेवण्यासाठी एकत्र आल्याचे सांगत सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसायचे ही काँग्रेस-राष्ट्रवादीत जणू काही प्रथाच पडली आहे. उभय बाजूने टोकाची भूमिका घेतल्याने त्याचा राजकीय लाभ दोघांनाही होतो. कारण दोघे भांडल्याने मतांची विभागणी या दोन पक्षांमध्येच होते व विरोधकांची पिछेहाट होते, असा अनुभव आहे.
सांगली महानगरपालिकेच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना लक्ष्य केले. आर. आर. पाटील यांनी नेहमीप्रमाणे राणे यांना अंगावर घेतले. ठाकरे यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल संशयाचे वातावरण तयार केले. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षाही वाईटप्रकारे आरोप-प्रत्यारोप सरकारमध्ये एकत्र असलेल्या मित्र पक्षांनी परस्परांवर केले. सांगलीमधील प्रचारातील आरोप-प्रत्यारोप हा काही नवा प्रकार नाही. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी कोकणात राणे आणि राष्ट्रवादीमध्ये अशाच प्रकारे सारे विधिनिषेध सोडून आरोप-प्रत्यारोप झाले होते. राणे यांच्या पाश्र्वभूमीबद्दल राष्ट्रवादीचे नेते नेहमीच उल्लेख करतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून राणे यांनी पुण्यात सभा घेऊन अजित पवार आणि आर. आर. पाटील यांच्यावर शरसंधान केले होते. भाजप-शिवसेनेचे नेते काँग्रेस वा राष्ट्रवादीवर आरोप करणार नाहीत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन दोन्ही काँग्रेसचे नेते भाषा वापरतात.
आरोप-प्रत्यारोपांमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वाभाडे निघत असले तरी निवडणुकांमध्ये उभयतांचा राजकीय फायदा होतो. कारण कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नसलेले मतदार अशा परिस्थितीत वाद घालणाऱ्या दोन पक्षांमध्ये विभागले जातात, असा अनुभव आहे. गेल्याच वर्षी झालेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढले आणि काही ठिकाणी यथेच्छ आरोप-प्रत्यारोप झाले. मतदारांनी या दोन पक्षांच्या बाजूनेच कौल दिला. भाजप, शिवसेना हे दोन्ही पक्ष मुंबई, ठाणे वगळता सर्वत्र मागे पडले. कोकणात अशाच पद्धतीने आरोप झाले तेव्हा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा झाला, पण विरोधकांच्या हाती काहीच लागले नव्हते.