महापौर निवासस्थानी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार असल्याने मुंबई शहराचा प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या निवासस्थानासाठी ‘घरघर’ सुरू झाली आहे. महापौरांच्या निवासस्थानासाठी शिवसेनेने महापालिका आयुक्तांच्या बंगल्याला पसंती दिली आहे, तर भायखळा येथील जिजामाता उद्यानातील अतिरिक्त महापालिका आयुक्तांसाठी असलेला बंगला किंवा मलबार हिल येथील जल अभियंत्याच्या बंगल्याचेही पर्याय समोर ठेवण्यात आले आहेत.
महापालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी महापालिका आयुक्तांच्या बंगल्याला महापौरांचे निवासस्थान म्हणून पसंती दर्शविली आहे. महापालिका आयुक्तांचा हा बंगला, भायखळा येथील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला की मलबार हिल येथील बंगला महापौरांचे निवासस्थान करायचे, असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर पडला आहे. या तीनपैकी कोणता बंगला द्यायचा, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र येत्या महिनाभरात याबाबत पालिका प्रशासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे.
महापौरांचे सध्याचे निवासस्थान १९३२ मध्ये पालिकेच्या ताब्यात आले. सुरुवातीला या बंगल्यात पालिकेचे कार्यालय होते. १९६२ मध्ये ही वास्तू महापौर निवासस्थान म्हणून जाहीर करण्यात आली.
१९६४-६५ मध्ये या बंगल्यात पहिल्यांदा डॉ. भवानीप्रसाद दिवगी हे महापौर म्हणून राहायला आले. हा बंगला तळ अधिक दोन मजले असा आहे. सुमारे अडीच एकर जागेत असून बंगल्याचे एकूण क्षेत्रफळ ४ हजार ५०० चौरस फूट इतके आहे. सागरी किनारपट्टी नियंत्रण कायद्याअंतर्गत येणारा हा महापौरांचा बंगला ‘हेरिटेज वास्तू’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.