गेल्या सहा महिन्यांपासून ऑनलाइन वर्गाना सरावलेल्या विद्यार्थ्यांचा आता शिक्षकांनाच उपद्रव होऊ लागला आहे. ऑनलाइन वर्गामध्ये आगंतुकांची घुसखोरी, नाव बदलून वर्गात हजेरी लावणे अशा खोडय़ांनी शिक्षकच हवालदिल झाले आहेत.

गेले सहा महिने शाळांचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. या नव्या पद्धतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातील असलेली उत्सुकता, धास्ती आता शमली आहे. ऑनलाइन वर्गाना सरावलेल्या विद्यार्थ्यांच्या खोडय़ांनी आता शिक्षकच हवालदिल झाले आहेत. ऑनलाइन वर्गामध्ये आगंतूक शिरकाव करतात. सामायिक चर्चेदरम्यान काही विद्यार्थ्यांची चेष्टा, अर्वाच्च भाषेतील संवाद, विनोद किंवा संदेश, शिक्षकांवर टिप्पणी हे सगळे कसे रोखायचे असा नवाच प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. असा संवाद साधणाऱ्याला तात्पुरते वर्गातून काढून टाकले तरीही या अडचणीवर कायमस्वरूपी तोडगा मिळत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

काय घडते?

ऑनलाइन वर्गाची लिंक विद्यार्थ्यांंना पाठवली जाते. ती एका ठराविक वर्गातील विद्यार्थ्यांंसाठी असते. परंतु हीच लिंक विद्यार्थी सर्वत्र पाठवतात आणि आगंतुकांचा ऑनलाइन वर्गात प्रवेश होतो. अनेकदा हे आगंतुक त्या शाळेचे विद्यार्थीही नसतात. कधी एका विशिष्ट नंबरचा वापर केवळ अशा उपद्रवासाठी केला जातो व नंतर तो नंबर बंद केला जातो. मुंबईतील एका शाळेत विद्यार्थ्यांने आँनलाईन वर्गात मुख्याध्यापकांच्या नावाने प्रवेश करून शिक्षकांना सूचना दिल्या होत्या. उपनगरातील एका शाळेने  विद्यार्थ्यांंना वठणीवर आणण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करण्याची वेळ आली आहे. ‘सायबर गुन्हे विभागाकडेही काही शाळांनी गंभीर घटनांच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. परंतु शाळेची प्रतिष्ठा धुळीला मिळेल व विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई झाल्यास त्याचे भविष्यात नुकसान होण्याच्या भितीमुळे तक्रार करण्यास शिक्षक व शाळा व्यवस्थापन तयार नसते,’ असे शिक्षक उदय नरे यांनी सांगितले.

विद्यार्थी अधिक तंत्रस्नेही

अनेकदा तंत्रज्ञान, त्याचा वापर याबाबत विद्यार्थी शिक्षकांपेक्षा अधिक अद्यायावत असतात. विद्यार्थी तंत्रज्ञान लवकर आत्मसात करतात. त्यामुळे शिक्षकांना ऑनलाइन वर्ग सांभाळणे अधिक जड जात आहे. शिक्षकांचे घर, परिसर, काही वेळी घरातील व्यक्ती हे विद्यार्थ्यांना कळते. त्यावरूनही शिक्षकांची चेष्टा होते. ‘प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थ्यांना शिस्त असते. नियम, शिक्षकांचा धाक असतो. ऑनलाइन वर्गात तेवढा धाक राहू शकत नाही. पालकांना याबाबत माहिती दिली तरी कायम लक्ष ठेवणे पालकांनाही शक्य नसते. अनेकदा पालकांना जाणिव करून देण्यासाठी त्यांच्याशी संपर्कही होत नाही. विशेषत: सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून अधिक त्रास होतो,’ असे एका शिक्षकांनी सांगितले.