इतर कंपन्यांचे पाणी केवळ आणीबाणीच्या वेळीच
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेने प्रवास करताना तहान लागली आणि स्थानकावरील खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर तुम्ही ‘बिस्लेरी’ मागितलीत, तर तुम्हाला नकार मिळू शकतो. कारण आता मुंबईच्या उपनगरीय भागात रेल्वेतर्फे केवळ ‘रेल नीर’ विकण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या स्थानकांवर इतर कोणत्याही कंपन्यांचे पाणी विकता येणार नाही. केवळ आणीबाणीच्या काळात, म्हणजेच ‘रेल नीर’चा पुरवठा कमी असल्यास इतर पाच कंपन्यांचे पाणी रेल्वे स्थानकांवर विकता येणार आहे.
रेल्वे प्रवाशांना शुद्ध पाणी पुरवण्याच्या दृष्टीने रेल्वेने ‘रेल नीर’ ही संकल्पना आणली. त्यानुसार २००३ मध्ये दिल्लीत पहिला ‘रेल नीर’ प्रकल्प सुरू करण्यात आला. मुंबईत ‘रेल नीर’चा प्रकल्प येण्यासाठी २०१४ साल उजाडावे लागले. अंबरनाथ येथे हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर ‘रेल नीर’चे पाणी मिळेल, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आदेशांनुसार या स्थानकांवर ‘रेल नीर’च विकण्याची सक्ती स्टॉलधारकांवर करण्यात आली आहे.
इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्यात दूषित पाणी भरून रेल्वे स्थानकांत विकले जाण्याची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यावर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘रेल नीर’ ही संकल्पना अस्तित्वात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. प्रवाशांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, हा यामागील हेतू आहे. त्यामुळेच रेल्वेने ‘रेल नीर’चा प्रकल्प सुरू केला आहे. सध्या अंबरनाथ येथील प्रकल्पातून दर दिवशी १.८ लाख लिटर पाण्याच्या बाटल्या भरून तयार होत आहे. मुंबईतील स्टॉलधारकांची गरज तेवढी असल्याने हे उत्पादन कायम ठेवण्यात येणार असल्याचेही रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
रेल्वेने ‘रेल नीर’ सक्तीचे केले असले तरी किनले, बिस्लेरी आदी पाच कंपन्यांसह मे २०१६ पर्यंत करार केले आहेत. याबाबत मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागातील एका अधिकाऱ्याला विचारले असता, ‘रेल नीर’चा तुटवडा भासल्यास प्रवाशांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून हे कंत्राट केल्याचे त्याने स्पष्ट केले. ‘रेल नीर’च्या पुरवठय़ात खंड पडणार नाही, याबाबत सर्व काळजी घेतली जात आहे. तरीही काही समस्या उद्भवली, तर प्रवाशांची गरसोय होऊ नये म्हणून ही उपाययोजना केल्याचे त्याने सांगितले.