13 December 2017

News Flash

झोपु प्रकल्पात प्रकाश मेहतांचा मुलगाही लाभार्थी!

विरोधकांचा विधिमंडळात आरोप; राजीनाम्याच्या मागणीवर ठाम

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: August 5, 2017 12:46 AM

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता

विरोधकांचा विधिमंडळात आरोप; राजीनाम्याच्या मागणीवर ठाम

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या भ्रष्टाचाराची एकामागून एक प्रकरणे बाहेर येऊ लागल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवरील दबाव वाढू लागला आहे. मेहता यांच्या कारनाम्यामुळे सरकारच्या पारदर्शकतेचा बुरखा फाटला असून त्यांच्या राजीनाम्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेत विरोधकांनी शुक्रवारीही विधिमंडळाचे कामकाज रोखले. एवढेच नव्हे तर मेहता यांनी एका झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात आपल्या मुलाला लाभार्थी ठरविल्याचा आरोप करीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली आहे.

विधानसभेत शुक्रवारी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मेहता यांच्यावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विखे पाटील यांनी मेहता यांचे आखणी काही घोटाळे उघड करून खळबळ उडवून दिली. मेसर्स श्री साईनिधी प्रा.लि. या कंपनीत नोव्हेंबर २००८ मध्ये प्रकाश मेहता अतिरिक्त संचालक होते. नंतर त्यांनी या कंपनीचा राजीनामा दिला. याच कंपनीच्या घाटकोपर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत लक्ष्मी भुवन आणि गोपाल भुवन या इमारती बांधण्यात आल्या. मात्र या जागेवरील मूळ भाडेकरूंना अजून घरे मिळालेली नसतानाही भाडेकरूंच्या यादीत गृहनिर्माणमंत्र्यांचा मुलगा हर्ष प्रकाश मेहता आणि इतर नातेवाईकांना बोगस भाडेकरू दाखवून त्यांना नव्या इमारतीत सदनिका देण्यात आल्या, असा दावा विखे पाटील यांनी सभागृहात केला. या कंपनीचे संचालक मुकेश दोशी हे मेहता यांचे जिवलग मित्र आहेत. दोशी यांची गृहनिर्माणमंत्र्यांशी किती जवळीक आहे, ते पाहायचे असेल तर विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यास सर्व समोर येईल, असे विखे पाटील म्हणाले.

आणखी एका प्रकरणात घाटकोपर येथील सम्यक दर्शन गृहनिर्माण सोसायटीत ४०३ हा फ्लॅट मेहता यांच्या पत्नीच्या किशोरी मेहता यांच्या नावावर आहे. याच बिल्डिंगमध्ये ६०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये बिल्डिंगचे मालक मनीष प्रवीणचंद्र शहा राहतात. त्यांच्याशी गृहनिर्माणमंत्र्यांचा वाद आहे. त्यामुळे या बिल्डिंगमध्ये बेकायदेशीर बांधकाम झाल्याची तक्रार करून गृहनिर्माणमंत्र्यांनी महानगरपालिकेचा कनिष्ठ अभियंता सागर पाटील यांच्यामार्फत या इमारतीचे विकासक आणि सर्व सदनिकाधारकांवर  एमआरटीपीखाली ११ मार्च २०१६ पंतनगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. मात्र त्यात आपली पत्नीही अडकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पत्नीच्या नावात किशोरी मेहता ऐवजी किशोर मेहता असे बदल केल्याचा आरोपही विखे पाटील यांनी या वेळी केला. मोपलवार यांच्यावर आरोप होताच त्यांच्यावर कारवाई झाली तोच नियम मेहता यांनाही लावा तसेच ही चौकशी कोणाच्या माध्यमातून होणार याचाही खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली.

अजित पवार यांनीही विखेंच्या मागणीस पाठिंबा देताना मेहता स्वत: राजीनामा देणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना काढावे अशी मागणी केली. मेहतांच्या राजीनाम्याशिवाय कामकाज चालविणे उचित होणार नाही असेही पवार म्हणाले. मात्र सरकारकडून कोणतेच समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने विरोधकांनी सरकार विरोधात फलक फडकावीत जोरदार घोषणाबाजी केल्याने कामकाज वांरवार तहकूब करण्यात आले.

आणखी काही नवे धागे..

एसआरएचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्या घोटाळ्यांबाबत जी प्रकरणे समोर येत आहेत, त्यातील एका प्रकरणात, मुकेश दोशी यांच्या मुलाचे म्हणजे कौशल मुकेश याचेही नाव असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला. मे. साईनिधी या कंपनीचे मुकेश दोशी हे संचालक मेहता यांचे जिवलग मित्र असून या कंपनीचे मेहता हे अतिरिक्त  संचालक होते, असा गौप्यस्फोट विखे पाटील यांनी केला.

मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य

मुंबई : एम. पी. मिल कंपाऊंडप्रकरणी विरोधकांनी मागणी केली म्हणून मी राजीनामा देणार नाही. यासंबंधीचा निर्णय घेण्यास मुख्यमंत्री सक्षम असून त्यांनी वा पक्षाने माझ्याकडे स्पष्टीकरण मागितले तर मी माझी भूमिका त्यांच्यासमोर स्पष्ट करेन, असे सांगत वादग्रस्त गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला.

माझे काम नैतिक की अनैतिक ते मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मला मान्य असेल. पक्षाचे प्रभारी माझ्याकडे स्पष्टीकरण मागतील, त्यानुसार निर्णय होईल. माझा राजीनामा मागण्याचा विरोधी पक्षांना नैतिक अधिकारच नाही, असे सांगत, गेल्या चार दिवसांपासून विरोधकांकडून सुरू असलेली राजीनाम्याची मागणीही मेहता यांनी धुडकावली.

First Published on August 5, 2017 12:46 am

Web Title: prakash mehtas son involved in sra scam