शासकीय रुग्णालयांमधील सिटी स्कॅन किंवा क्ष-किरण आदींची यंत्रे बंद पडून गोरगरीब रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेता या साऱ्या सुविधांच्या खासगीकरणाची प्रक्रिया येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण केली जाईल व अल्प दरात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
शासकीय रुग्णालयांमध्ये ही यंत्रणा चालविणाऱ्या कंपन्यांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महागडय़ा उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाच ही यंत्रे शासकीय रुग्णालयांच्या आवारात बसविता येतील, अशी अट ठेवण्यात आली होती.
खासगीकरणाच्या माध्यमातून ही यंत्रे बसविण्यात आली तरी गोरगरिबांना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. सध्याच्या निकषानुसार पैसे आकारले जातील. खासगी कंपन्यांनी ही यंत्रे बसविल्याने ही सुरू राहतील, असे सांगत शेट्टी यांनी आरोग्य खात्यातील गैरप्रकार करणाऱ्यांना चांगलाच टोला हाणला.
परभणी जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांबाबत शिवसेनेचे संजय जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर ही पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन शेट्टी यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील ३५ शासकीय रुग्णालयांमध्ये क्ष-किरण आणि सिटी स्कॅन यंत्रे खासगीकरणाच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू केली जाणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.