मुंबईत खासगी कंपनीकडून वीज ग्राहकांची करण्यात येणाऱ्या लुटीच्या विरोधात शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. वांद्रे ते धारावीपर्यंतच्या या पदयात्रेत राहुल यांच्याबरोबर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांना हुरूप यावा, यासाठी ही पदयात्रा आयोजित केल्याची चर्चा आहे. राहुल गांधी शुक्रवारी दोन दिवसीय दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. आज त्यांचा दौऱ्याचा दुसरा दिवस असून त्यांनी सकाळी विलेपार्लेतील एनएमआयएमएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जीएसटी, पठाणकोट हल्ला यांच्यासह इतर अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीका केली. नववर्ष साजरे करून युरोपातून मायदेशी परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सक्रिय झाले आहेत. राज्यनिहाय नेत्यांना भेटून त्यांनी पक्षकामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.