ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांवरील अत्याचार तसेच विनयभंगाचे प्रकार सुरूच असून ठाणे तसेच भिवंडी भागात लग्नाचे आमिष दाखवून तरुणींवर बलात्कार करण्यात आल्याच्या दोन घटना मंगळवारी उघडकीस आल्या आहेत. तसेच इंदिरानगर भागात जुन्या भांडणाच्या वादातून एका २१ वर्षीय तरुणाने ४० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या तिन्ही घटनांप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
नवी मुंबई येथील कोपरखैरणे परिसरात राहणारी २७ वर्षीय तरुणी वागळे इस्टेट भागातील एका कंपनीत काम करते. या कंपनीमध्ये काम करणाऱ्या विक्रांतसिंग  चव्हाण (२६, रा. विक्रोळी) याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. गेल्या सहा महिन्यांपासून कोपरी येथील एका लॉजवर तसेच इतर ठिकाणी नेऊन तो तिच्यावर बलात्कार करीत होता. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विक्रांतसिंगला अटक केली आहे.
भिवंडी येथील नवीवस्ती भागात राहणारा सद्दाम निजामुद्दीन शेख (२४) हा एका मोती बनविण्याच्या कारखान्यात काम करतो. त्याचे शांतीनगर भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याने ४ डिसेंबरला या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशमध्ये नेले व  तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, त्याचे लग्न झाले असून त्याला मुलगा असल्याचे कळताच या तरुणीने आई-वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या मदतीने दोन दिवसांपूर्वी ती ठाण्यात आली. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सद्दामला अटक केली आहे.
महिलेचा विनयभंग
इंदिरानगर भागात राहणारी एक ४० वर्षीय महिला मंगळवारी रात्री ९.३० वाजता दुकानावर डाळ आणण्यासाठी जात होती. त्या वेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून याच भागात राहणाऱ्या संतोष केवट (२१) याने या महिलेला धमकी देऊन तिचा विनयभंग केला. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संतोषला अटक केली आहे.