इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या १६ ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर उभारण्याची घोषणा डिसेंबर २०१२ मध्ये केंद्र सरकारने केली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची घोषणा केली. मात्र गेल्या आठ महिन्यात सरकारने याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. स्मारक उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या तसेच स्मारक कसे असावे याबाबतचे आराखडे तयार करण्याबाबत एकही बैठक झालेली नाही. सरकार केवळ घोषणा करीत असून स्मारक उभारण्याबाबत प्रत्यक्षात कोणताही कार्यवाही न करता चालढकल करीत असल्याचा आरोप आठवले यांनी केला. निर्ढावलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला जागे करण्यासाठी येत्या १६ ऑगस्टपासून पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून ते २२ ऑगस्टपर्यंत चालेल. निदर्शने, धरणे, मोर्चा, रास्ता रोको आदी मार्गाने हे आंदोलन छेडण्यात येणार आहे, असे आठवले यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.