शिवसेनेचे भाजपला खुले आव्हान

शिवसेनेची राष्ट्रभक्ती सहन होत नसेल, तर भाजप सरकारने राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान देत शिवसेनेचे मंत्री राजीनामा देवून सरकारमधून बाहेर पडणार नाहीत, हे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये खणाखणी सुरु असली तरी शिवसेना सरकारचा पाठिंबा स्वतहून काढणार नसून िहमत असेल, तर भाजपने शिवसेनेला सोडचिठ्ठी द्यावी, अशी शिवसेनेची भूमिका आहे. अयोध्येत राममंदिर उभारणी करावी आणि देशात समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र सरकार टिकविण्यासाठी नरमाईच्या भूमिकेत असून शिवसेनेमुळे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटूनही शिवसेनेकडे डोळेझाक करण्यात येत आहे.

गेले काही दिवस शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले असून त्यामुळे शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार, अशी चर्चा मंगळवारी दिवसभर सुरु होती. मात्र सत्ता सोडण्याची शिवसेनेची तयारी नसून विरोधी पक्षांपेक्षा सरकारला अधिक अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. भाजपलाही सरकार टिकविण्यासाठी शिवसेनेची दांडगाई सहन करण्याखेरीज पर्याय नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंध टोकाला जावू नयेत, अशी भूमिका घेतली आहे.

खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या राष्ट्रभक्तीवरच शंका घेतल्यानंतर त्याला भाजपने प्रत्युत्तर दिले. त्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकण्याच्या घटनेचे समर्थन केले.

पाकिस्तानला विरोध ही राष्ट्रभक्ती असून हे कृत्य करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांचा अभिमानच असल्याचे त्यांनी सांगितले. आमची भूमिका राष्ट्रभक्तीची असल्याने ज्यांना त्याची अडचण वाटत असेल, त्यांनी राजीनामा द्यावा. सरकार हे दोघांचे आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलाच नाही

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलाच नाही, अशी टीका करुन ज्या तुकाराम ओंबळेसारख्या पोलिसांनी पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य पत्करले, त्या शहीदांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अवमान केला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी शाई फेकण्याचे केलेले कृत्य हे राष्ट्रभक्तीचेच असून पाकिस्तानशी लढणे हा गुन्हा असेल, तर तो शिवसेनेने केला असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. कुलकर्णी यांच्यावर शाई फेकणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांनी मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना नेते उघडपणे भाजपवर टीकास्त्र सोडत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र सायंकाळी उशिरापर्यंत कोणतेही वक्तव्य न करणेच पसंत केले व मौन पाळले. शिवसेनेचे मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासमवेत मंत्रालयात आरोग्य विभागाचा आढावाही घेतला.